पेपर विक्रेत्यांची नेहमीच येते पहाट कष्टाची
By Admin | Updated: July 18, 2014 01:48 IST2014-07-18T00:40:18+5:302014-07-18T01:48:22+5:30
सितम सोनवणे , लातूर जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला कष्ट करावे लागतात़ या कष्टाला सीमा नाही, ते पहायला मिळाले़

पेपर विक्रेत्यांची नेहमीच येते पहाट कष्टाची
सितम सोनवणे , लातूर
जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला कष्ट करावे लागतात़ या कष्टाला सीमा नाही, ते पहायला मिळाले़ गुरुवारी पहाटे ४़ ३० वाजता शिवाजी चौकातील उड्डाण पुलाखालील पार्किंगच्या जागेत व एका हॉटेलसमोर आलेल्या वृत्तपत्र घरोघरी पोहोच करणाऱ्या पेपर विके्रत्यांची बारा महिने ही पहाट कष्टाचीच असते़ हे पहायला मिळाले़ या कष्टाला जणू त्यांनी जीवनच समर्पण केले आहे़
दररोजप्रमाणे गुरुवारी पहाटे ४ वाजता फेरफटका मारत असताना शिवाजी चौकात पोहोचलो़ एका हॉटेलवर पाच-सहा तरूण चहा पित होते़ तर काही त्यामध्ये असलेल्या पान टपरीवर पान सुपारीची मागणी करत होते़ शिवाजी चौकातलं वातावरण लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाले होते़ अंबाजोगाई रोडकडून आलेले दोन-तीन आॅटो कॉर्नरवर थांबले़ त्यातल्या एका आॅटोत ‘देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए’ हे गाणं वाजत होतं़ बार्शीे रोडकडून आलेली ट्रॅव्हल्स चौकात थांबली़ काही प्रवाशी उतरले़ त्या पाठोपाठ दोन जीप आल्या़ त्यातील एक उड्डाण पुलाखाली थांबली तर दुसरी अंबाजोगाई रोडकडे जाऊन मध्येच वळून थांबली़
त्या दोन्ही गाड्यातून एक-एक व्यक्ती बाहेर येऊन जीपमधील पेपरचे गठ्ठे खाली टाकायला सुरुवात केली़ पंधरा-वीस गठ्ठे टाकून जीपा परत सुसाट निघुन गेल्या़ पहाटेचा थंड वाराही अंगाला झोंबत होता़ काही वेळाने सायकल, दुचाकीवर माणसांची वर्दळ वाढू लागली़ त्यातील बऱ्याच सायकली उड्डाणपुलाखाली पेपरच्या गठ्ठ्याकडे वळल्या़ तर काही अंबाजोगाई रोडकडील पेपरच्या गठ्ठ्यांकडे वळल्या़ सायकली उभ्या करून पेपरच्या गठ्ठ्यावरील लेबल पाहून आपापले गठ्ठे घेऊन त्यामधील पुरवणी, पत्रके टाकत होती़
बघता बघता उड्डाणपुलाखाली व अंबाजोगाई रोडकडेही ३० ते ४० जणांचा ताफा जमा झाला़ प्रत्येकाची एक वेगळीच घाई चालू होती़ प्रत्येकांची घरेही लांब असल्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासूनच चौकाकडे येण्याचे नियोजन करत ४ वाजेपर्यंत ते पोहचले होते़ या पेपर विकणाऱ्यांकडेही घरांची विभागणी केलेली दिसली़ त्यात काहींकडे ३०० काहींकडे ७०० घरे असल्याचेही त्यांनी सांगितले़ वाचकांच्या हाती लवकरात लवकर वृत्तपत्र कसे पडेल याचीच घाई त्यांची दिसत होती़
या कामासाठी त्यांना कष्ट मात्र फार घ्यावे लागत होते़ म्हणून ही पहाट त्यांची कष्टाचीच पहाट असते, ही जाणीवही झाली़ याठिकाणी वृत्तपत्र टाकणारे मोहन माने यांच्याशी चर्चा करताना ते म्हणाले, मागील ३० वर्षांपासून नियमितपणे पहाटे ४ ते १० वाजेपर्यंत ७०० अंक गांधी चौक, पाण्याची टाकी या परिसरात टाकतो़ अंक टाकून झाल्यानंतर राहिलेली वसुली करत राहतो़ यावरच कुटुंबाचा सर्व डोलारा चालतो़ किशन क्षीरसागर, मनोज कुदळे, शेषेराव बिराजदार, मोहन कुदळे, पद्माकर कुलकर्णी, रणजीत कांबळे, लक्ष्मण पेटकर हे मागील २५ ते ३० वर्षापासून वृत्तपत्र विक्रीचे काम करत असून, पहाटे ४ वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत वाचकांच्या हाती वृत्तपत्र लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतात़
एक हात नाही म्हणून न बसता ३२ वर्षापासून वृत्तपत्र विक्रीचे काम करणारे मोहन धर्माधिकारी वाघासारखी एकहाती झुंज देत एका हाताने गाडी चालवत ८०० अंकाचे वितरण करतात, हे त्यांनी सांगितले़