पपईच्या बागा उद्ध्वस्त; पाच जनावरे दगावली !

By Admin | Updated: April 8, 2016 00:24 IST2016-04-08T00:09:44+5:302016-04-08T00:24:28+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्याच्या विविध भागात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.

Papaya baga spoiled; Five Animals Dangled! | पपईच्या बागा उद्ध्वस्त; पाच जनावरे दगावली !

पपईच्या बागा उद्ध्वस्त; पाच जनावरे दगावली !


उस्मानाबाद : जिल्ह्याच्या विविध भागात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव, पिंपळा खुर्द परिसरातील पपईच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच हगलूर येथे वीज पडून बैलजोडी दगावली. त्याचप्रमाणे लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथे वीज पडून दोन जनावरे ठार झाली. भूम तालुक्यातील देवळाली येथेही वीज पडून गाय दगावली असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. माळुंब्रा शिवारातील विद्युत खांब वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडले. त्यामुळे अनेक गावे तब्बल चोवीस तास अंधारात होती.
तामलवाडी : बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सुरतगाव, पिंपळा खुर्द शिवारातील पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच झाडेही उन्मळून पडली असून सांगवी काटील येथील हॉटेलवरील पत्रे उडून गेले.
बुधवारी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत पावसासोबतच गारपीटही झाली. यामध्ये सुरगाव शिवारातील अभिजित खोपडे तसेच रोहन खोपडे यांच्या पाच एकर क्षेत्रातील पपईची बाग उद्ध्वस्त झाली. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. पिंपळा खुर्द शिवारातील संतोष रामा धनके यांचीही ७६ गुंठे क्षेत्रातील पपईची बाग गारपीटीमुळे हातातून गेली आहे. यांचे जवळपास पाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. गुरूवारी दुपारी तलाठी आबा सुरवसे, कृषी सहाय्यक आर. पी. संकपाळ यांनी नुकसानीचा पंचनामा केला. तामलवाडी येथील दत्तात्रय घोटकर यांच्या पॉलीहाऊसचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सांगवी काटीसह माळुंब्रा परिसरात झाडे उन्मळून पडली आहेत. जळकोटवाडी, वडगाव काटी शिवारातील द्राक्ष बागांना फटका बसला आहे. तसेच अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत.
वीज पडून बैलजोडी ठार
नळदुर्ग : बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून बैलजोडी दगावल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील हगलूर येथे घडली. हगलूरसह परिसरात बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. यातच विष्णू हिराचंद घुगे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला बांधलेल्या बैलजोडीच्या अंगावर वीज पडली. यामुळे दोन्ही बैल दगावले. हेकॉ तांबोळी व तलाठी ए. बी. काळे यांनी गुरूवारी सकाळी घटनेचा पंचनामा केला.
सेडनेटचे नुकसान
उस्मानाबाद : तालुक्यातील पळसप परिसरातही सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह गारा बरसल्या. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सेडनेटचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
लोहारा : तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे बुधवारी रात्री वीज पडून दोन जानावरे जागीच ठार झाली. हिप्परगा (रवा) येथे बुधवारी रात्री सात वाजल्यापासून विजांच्या कडकडासह वादळी वारे व हलकासा पाऊस झाला. रात्री नऊच्या सुमारास वर्षा ज्ञानेशर मोरे यांच्या शेतात बांधलेल्या दोन गायीवर वीज पडल्याने दोन्ही गायी जागीच ठार झाल्या. तलाठी डी.एम.रेड्डी यांनी घटनेचा पंचनामा केला.
माणकेश्वर : देवळाली परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. देवळाली येथील शेतकरी रमेश धोंडीबा हापसे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला बांधलेल्या गायीच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तसेच तांबेवाडी परिसरात गारांचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे छावणीवरील निवारा उडून गेला. राजाभाऊ भगवान जैन यांच्या गायीला गारांचा मार लागल्याने दगावली. तसेच गावातीलच द्रौपदी जाधवर यांचे पत्र्याचे सेड उडून गेल्याने संसार उघड्यावर आला आहे. माणकेश्वर सज्जाचे तलाठी बी. ए. वाघमारे, देवळालीचे तलाठी व्ही. व्ही. कोळी यांनी गुरूवारी स्थळ पंचनामा केला.

Web Title: Papaya baga spoiled; Five Animals Dangled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.