पंकजांवर निवडणूक लढण्याची नामुष्की
By Admin | Updated: April 1, 2015 01:01 IST2015-04-01T00:39:52+5:302015-04-01T01:01:00+5:30
अंबाजोगाई : येथील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची निवडणूक होत असून मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महिला गटात दोन जागांसाठी तीन अर्ज राहिले पंकजांवर निवडणूक लढण्याची नामुष्की

पंकजांवर निवडणूक लढण्याची नामुष्की
अंबाजोगाई : येथील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची निवडणूक होत असून मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महिला गटात दोन जागांसाठी तीन अर्ज राहिले. तर सर्वसाधारण गटात दहा जागांसाठी ११ उमेदवारी अर्ज राहिले. तीन संचालक बिनविरोध निघाले असून बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे उमेदवार आहेत.
मंगळवारी महिला गटात दोन जागेसाठी तीन उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने पंकजा मुंडे यांच्यावर निवडणूक लढण्याची नामुष्की ओढावली आहे. आठवडाभरापासून पंकजा यांची सुरू असलेली शिष्टाई अखेर अंबाजोगाईकरांनी निष्फळ ठरविली. मात्र दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी तीन संचालक बिनविरोध निघाले आहेत. अंबाजोगाईकरांनी पंकजांच्या शिष्टाईस प्रतिसाद न दिल्याने निवडणूक लढविण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. महिला गटात संगीता प्रकाश आपेट यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने आता बँकेच्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. सदरील निवडणुकीचे कामकाज तालुका उपनिबंधक एम.एस. गौंड पाहत आहेत.
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्यासमोर उमेदवार नसेल अशी अपेक्षा अनेकांची होती. परंतु महिला गटात त्यांच्यासमोर दोन अर्ज असल्यामुळे त्यांना आता प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे त्यांच्यावर आपुलकीचा पाऊस होईल, अशी अपेक्षा आता फोल ठरत आहे. त्यामुळे एका दृष्टीने पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक परीक्षा ठरणार आहे. यामुळे आता होणाऱ्या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. दोन महिला उमेदवार त्यांच्यासमोर आल्या असल्यामुळे अखेरपर्यंत या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष राहणार आहे. यात दुमत नाही. (वार्ताहर)४
गेल्या तीन वर्षांपासून लांबलेल्या सहकारी बँकेच्या तसेच पतसंस्था, शेती संस्था आदींच्या निवडणुकांचा कार्यक्रम महिन्याभरापूर्वी जाहीर झाला आहे. ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे ड व क वर्गातील निवडणूका पार पडल्यानंतर आता ब आणि अ वर्गातील निवडणुका मोठ्या गतीने होत आहेत. पूर्णवादी बँक, शाहू बँक, गजानन नागरी बँक, दीनदयाळ बँक यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तालुका निबंधक कार्यालयामार्फत अर्ज स्वीकारणे, अर्जाची छाननी करणे आदी प्रक्रियांच्या तारखा संबंधित संस्थांना देण्यात आल्या आहेत. तसेच उपजिल्हा निबंधक कार्यालयात संस्थांची माहिती डकविण्यात आली आहे. ब गटामध्ये जवळपास ८३ संस्था आहेत. अ वर्गामध्ये केवळ बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता पुढील काळात सहकारी संस्थेच्या निवडणुकांचा धुराळा पहावयास मिळणार आहे. अनेक ठिकाणी गटबाजीला उधाण आले असून त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकीचे वैशिष्ठ्य म्हणजे काही सहकारी संस्था बिनविरोध काढल्या जात आहेत. सहकारी सोसायट्याही बिनविरोध निघत असल्याचे गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत पहावयास मिळाले. काही ठिकाणचे वादाचे किरकोळ प्रकार वगळता बिनविरोधला प्राधान्य दिले जात असल्याचे एकंदरीत चित्र आहे.