पीकविम्यावरुन दगडफेक

By Admin | Updated: July 24, 2015 00:49 IST2015-07-24T00:19:34+5:302015-07-24T00:49:53+5:30

परळी : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या नावे असलेली पीकविम्याची रक्कम देण्यास दिरंगाई केली जात असल्याच्या कारणावरून काही जणांनी संतप्त होऊन

Pandemic | पीकविम्यावरुन दगडफेक

पीकविम्यावरुन दगडफेक


परळी : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या नावे असलेली पीकविम्याची रक्कम देण्यास दिरंगाई केली जात असल्याच्या कारणावरून काही जणांनी संतप्त होऊन परळी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर गुरूवारी सकाळी ११.३० च्या सुमारास दगडफेक केली. अचानक सुरू झालेल्या या दगडफेकीमुळे बँकेतील कर्मचारी घाबरून गेले. दुपारनंतर बाहेरून बँकेच्या कार्यालयास कुलूप लावण्यात आले होते.
परळी मोंढा भागातील जिल्हा बँकेच्या परळी शाखेत गेल्या ८ दिवसांपासून पीक विम्याची रक्कम वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. परळी तालुक्यातील बेलंबा, दादाहरी वडगांव, भोपला येथील पात्र पीक विमा धारकांना विम्याची रक्कम देण्याचे काम चालू आहे. गुरूवारी पीक विम्याची व दुष्काळ अनुदानाची यादी शेतकऱ्यांना पहावयास मिळाली नाही. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या पाल्यांची पीक विम्याची रक्कम देण्यास दिरंगाई होत आहे. गुरूवारी सकाळी ११.३० वा. काही शेतकऱ्यांचे पाल्य मयत वडीलांच्या नावाने मंजुर झालेल्या पीक विम्याची रक्कम घेण्यासाठी बँकेत आले व त्यांनी पीक विम्याच्या रकमेची मागणी केली. कर्मचाऱ्यांनी त्यांना नोटरी करून आणण्याचे सांगितल्याने काही ते संतप्त झाले. त्यामुळे त्यांनी बँकेच्या बाहेर जाऊन दगडफेक केली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे बँकेतील कर्मचारी घाबरुन गेले. स्वत:चा बचाव करीत काही कर्मचाऱ्यांनी दरवाजा आतून बंद करुन घेतला.
येथील शाखाधिकारी ३ दिवसाच्या वैद्यकीय रजेवर गेलेले असतांना सुध्दा या ठिकाणी इतर अधिकारी आले नाहीत.
शुक्रवारपासून मोंढ्यातील बँकेच्या शाखेत पीक विम्याचा हप्ता स्विकारणे सुरू केले जाणार असल्याने या ठिकाणी कर्मचारी वर्ग वाढवावा व काऊंटरची संख्या वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. आतापर्यंत या शाखेतून दीड कोटी रूपये वाटप करण्यात आले आहेत व आणखी १ कोटी रूपयाच्या जवळपास रक्कम वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती परळी शाखेच्या सुत्रांनी दिली. पीकविमा वाटप प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे. (वार्ताहर)
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परळीतील शाखेत शुक्रवारपासून पीक विम्याचा हप्ता भरून घेतला जाणार आहे. परंतु या ठिकाणी केवळ एकच काऊंटर असून तीनच कर्मचारी आहेत. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांची गोची होत आहे. या ठिकाणी काऊंटरची संख्या वाढवावी व कर्मचारी वाढवावेत अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व कन्हेरवाडीचे शेतकरी ज्ञानोबा फड यांनी केली आहे.
४ भवानी नगर भागातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत गुरूवारी पिक विमा भरण्यास आलेल्या नागरीकांना कागदपत्रांचा तुटवडा भासला व या ठिकाणीही कर्मचाऱ्यांची संख्या व काऊंटर वाढविणे आवश्यक असल्याचे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांनी दगडफेक करणे हा चुकीचा प्रकार आहे. शेतकऱ्यांनी रितसर बँकेची प्रोसिजर पूर्ण करुन पीक विम्याची रक्कम घेऊन सहकार्य करावे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचनेवरुन पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात येत आहे.
- नितीन ढाकणे, संचालक,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बीड

Web Title: Pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.