पंचायत समितीला टाळे
By Admin | Updated: March 30, 2016 00:43 IST2016-03-30T00:34:27+5:302016-03-30T00:43:24+5:30
तुळजापूर : तालुक्यातील अणदूर येथील अंतर्गत रस्त्याची निकृष्ठ कामे करणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते़ मात्र,

पंचायत समितीला टाळे
तुळजापूर : तालुक्यातील अणदूर येथील अंतर्गत रस्त्याची निकृष्ठ कामे करणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते़ मात्र, आश्वासन देवूनही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ अणदूर येथील जवळपास २५० ग्रामस्थांनी तुळजापूर पंचायत समितीवर मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकले़
अणदूर गावातील अंतर्गत रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा आरोप करीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सन २०१३ मध्ये उपोषण केले होते़ या उपोषणाची दखल घेऊन पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी झालेले काम हे निकृष्ठ दर्जाचे झाले असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले होते़ या आश्वासनानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले होते़ मात्र, या आंदोलनाला जवळपास तीन वर्षाचा कालावधी लोटत आला तरी कारवाई केली जात नव्हती़ वेळोवेळी निवेदने, तक्रारी देवूनही पंचायत समिती प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतापलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी मंगळवारी दुपारी पंचायत समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढला़ मोर्चेकऱ्यांनी पंचायत समितीत दाखल होताच थेट कार्यालयाला टाळे ठोकले़ तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयालाही टाळे ठोकले़ आंदोलनात सहभागी नागरिकांसह महिलांनी आक्रमक पवित्र घेतला. त्यावर बीडीओ खिल्लारे यांनी एक महिन्याच्या आत या प्रकरणात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले़ या आंदोलनात भाजपाचे दीपक घोडके, प्रदीप घुगे, राजेश देवसिंगकर, जयश्री स्वामी, सारिका मोराळे, अनुराधा पापडे, बालाजी कुलकर्णी, आशोक घोडके यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. (वार्ताहर)