पंचनाम्याची प्रक्रिया संथ गतीने
By Admin | Updated: April 16, 2015 00:59 IST2015-04-16T00:53:10+5:302015-04-16T00:59:48+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे फळबागा, भाजीपाला व धान्य पिकांचेही मोठे नुकसान झाले. हजारो हेक्टर्सवरील पिके व फळबागांचे नुकसान होऊनही

पंचनाम्याची प्रक्रिया संथ गतीने
बाळासाहेब जाधव , लातूर
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे फळबागा, भाजीपाला व धान्य पिकांचेही मोठे नुकसान झाले. हजारो हेक्टर्सवरील पिके व फळबागांचे नुकसान होऊनही पंचनाम्यांच्या कामांना मात्र गती मिळाली नाही. प्रातिनिधिक स्वरुपात औसा तालुक्यातील किल्लारी येथील फळबागांचे पंचनामे सुरू करण्यात आले. परंतु, उर्वरित पंचनाम्यांच्या कामांना मात्र तब्बल तीन दिवस होऊनही सुरुवातच झाली नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने पिकांचे, फळबागांचे व धान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लातूर तालुक्यातील ६४ गावांतील ४०४ हेक्टर्स फळबाग क्षेत्र, ३७५ भाजीपाला क्षेत्र व ५७५ धान्य पिकांचे क्षेत्र असे एकूण १३५४ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील १३५ गावांतील १९५ हेक्टर्स फळबागा, १५२ हेक्टर्स भाजीपाला, १७५ हेक्टर्स धान्य पिके अशा एकूण ५२२ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात फळबागांचे क्षेत्र मोठे असल्याने ३३.३० हेक्टर्सवरील आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील ५६ गावांतील ६०.८० हेक्टर्स फळबागा, २२ हेक्टर्स भाजीपाला, १४० हेक्टर्स धान्य पिके अशा एकूण २२२ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. देवणी तालुक्यातील ३८ गावांतील ९५ हेक्टर्सवरील फळबागा, २८ हेक्टर्सवरील भाजीपाला, ७ हेक्टर्सवरील धान्य पिके अशा एकूण १८३ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. जळकोट तालुक्यातील २५ गावांतील २० हेक्टर्सवरील फळबागा, ५० हेक्टर्सवरील भाजीपाला, ४० हेक्टर्सवरील धान्य पिके अशा एकूण ११० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अहमदपूर तालुक्यातील ७९ गावांतील २२१.४५ हेक्टर्सवरील फळबागा, ६३.६० हेक्टर्सवरील भाजीपाला अशा एकूण २८५.०५ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. औसा तालुक्यातील ६३ गावांतील ३५० हेक्टर्सवरील फळबागा, १२६.७० हेक्टर्सवरील भाजीपाला, १०.६० हेक्टर्सवरील धान्य पिके असे एकूण ४८७.३० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. उदगीर तालुक्यातील २५ गावांतील ५५ हेक्टर्सवरील फळबागा, २० हेक्टर्सवरील भाजीपाला अशा एकूण ७५ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. चाकूर तालुक्यातील ५२ गावांतील २५४ हेक्टर्सवरील फळबागा, १८ हेक्टर्सवरील भाजीपाला अशा एकूण २७२ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे.