पैठण रोड हस्तांतरण प्रकरण तळ्यात-मळ्यात
By Admin | Updated: October 20, 2016 01:40 IST2016-10-20T01:10:35+5:302016-10-20T01:40:43+5:30
औरंगाबाद : पैठण रोडच्या रुंदीकरण आणि चौपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून करण्यासाठी

पैठण रोड हस्तांतरण प्रकरण तळ्यात-मळ्यात
औरंगाबाद : पैठण रोडच्या रुंदीकरण आणि चौपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून करण्यासाठी मध्यंतरी सुरू झालेल्या हालचाली सध्या गुलदस्त्यात गेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने २२ कोटी ५० लाख रुपयांतून पुन्हा डांबरीकरणाचे काम सुरू केले असून, बिडकीन येथे त्या कामाचे भूमिपूजन ३ आॅक्टोबर रोजी पार पडले. सध्या कामाला सुरुवात झाली आहे.
पैठण रोडचे नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून काम करून घ्यायचे ठरल्यास १६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एवढा निधी तातडीने उभा करणे शक्य नाही. तसेच ते काम हस्तांतरित करण्याप्रकरणी हायवे अॅथॉरिटीला अद्याप काहीही सूचना आलेल्या नाहीत. एनएचएआयने त्या रस्त्याचे काम करावे. यासाठी बांधकाम विभागाने केंद्रीय दळणवळण खात्याला पत्र दिले आहे. त्यानंतर मुंबईला बांधकाम विभाग आणि एनएचएआयमध्ये तीन बैठका झाल्या; परंतु त्या रस्त्याच्या हस्तांतरणाप्रकरणी काहीही निर्णय झाला नाही. नरकयातना देणारा आणि अपघातांना निमंत्रण देणारा तो रस्ता औरंगाबादकरांसाठी मृत्यूचा सापळा झालेला आहे.
६ वर्षांपासून या रस्त्यासाठी चार वेळा वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या. पूर्वीच्या आघाडी सरकारने काढलेले बीओटीचे ३८६ कोटी रुपयांचे कंत्राट विद्यमान सरकारने रद्द केले. त्यानंतर हा रस्ता बांधकाम विभागाने करण्यासाठी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. सुरुवातीला २२ कोटी रुपये आणि नंतर पुन्हा ३० कोटी रुपयांतून या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे अंदाजपत्रक तयार झाले आहे.