वेदनांनी तडफडताहेत रूग्ण !

By Admin | Updated: July 4, 2014 00:17 IST2014-07-03T23:37:34+5:302014-07-04T00:17:49+5:30

उस्मानाबाद : प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून असहकार काम बंद आंदोलन सुरू केले आहे़

Pain is aggravated by suffering! | वेदनांनी तडफडताहेत रूग्ण !

वेदनांनी तडफडताहेत रूग्ण !

उस्मानाबाद : प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून असहकार काम बंद आंदोलन सुरू केले आहे़ अगोदरच समस्यांच्या गर्ततेत असलेली आरोग्य यंत्रणा आंदोलनामुळे पूर्णत: कोलमडली आहे़ त्यामुळे अनेकांना आर्थिक झळ सहन करीत खासगी दवाखाना गाठावा लागत आहे़ विशेष म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदन होत नसल्याने ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयात मृतदेह रेफर होवू लागले आहेत़
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मॅग्मो संघटनेच्या वतीने अनेक वर्षापासून विविध आंदोलने उभा करण्यात आली आहेत़ यापूर्वी राज्य शासनाने दिलेले आश्वासन नेहमीप्रमाणे हवेतच विरल्याने मॅग्मो संघटनेच्या राज्यातील सर्वच शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर डेपासूनच आंदोलनाचे हत्यार उपसले आहे़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाह्य रूग्ण विभाग, आंतररूग्ण विभाग, अत्यावश्यक सेवा, एमएलसी, शवविच्छेदन, साथरोग, आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, शासकीय कामकाजावर बहिष्कार टाकल्याने आंदोलनाची तीव्रता वाढत आहे़ तर प्रा़आरोग्य केंद्र, तालुका वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा रूग्णालयासह इतर आरोग्य विभागातील मॅग्मोशी संलग्नित असलेले अधिकारी सहभागी झाल्याने रूग्णांचे तीन दिवसांपासून मोठे हाल होत आहेत़ परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात पहिल्याच दिवशी वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी आंदोलनात सहभागी असलेल्या वैद्यकीय अधीक्षक डॉ़ संजय वाळके यांना शवविच्छेदन करावे लागले़ तर वाशी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील एका इसमाने बुधवारी सकाळी आत्महत्या केली़ मयताचे पार्थिव पारा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते़ मात्र, वैद्यकीय अधिकारी नसल्याने तेथून पुन्हा वाशी येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले़ तेथील अधिकाऱ्यांनी नंतर शवविच्छेदन केले़ लोहारा तालुक्यातील कानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या खेड येथील एका जळीत इसमाच्या पार्थिवावर बुधवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी शवविच्छेदन होऊ शकले नाही़ त्यामुळे तो मृतदेह गुरूवारी लोहारा येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनास आणण्यात आला होता़ रात्री उशिरापर्यंतही त्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाले नव्हते़ शहरी, ग्रामीण भागात अशीच परिस्थिती असून, आंदोलनाचे चटके रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना सहन करावे लागत आहेत़ (प्रतिनिधी)
सहा तासानंतरही शवविच्छेदन नाही
लोहारा : येथील ग्रामीण रूग्णालयात गुरूवारी दुपारी शवविच्छेनासाठी आणलेल्या प्रेतावर रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन न झाल्याने नातेवाईकांमधून संताप व्यक्त होत होता़ दुपारी ४़३० च्या सुमारास रूग्णालयात आणलेल्या प्रेतावर वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी सहा तासानंतरही शवविच्छेदन झाले नव्हते़
जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे़ त्यामुळे ग्रामीण रूग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत़ तालुक्यातील खेड येथील किसन विश्वनाथ शिवराये (वय-४२) या हा इसम आगीत होरपळल्याने मयत झाला होता़ मयत अवस्थेत लोहारा ग्रामीण रूग्णालयात दुपारी ४़३० वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले होते़ पोलिसांनी पंचनामा केला़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संप असल्याने एकही वैद्यकीय अधिकारी रूग्णालयात उपस्थित नव्हता़ शवविच्छेदनासाठी येणेगूर येथील वैद्यकीय अधिकारी येणार असल्याचे मयताच्या नातेवाईकास सांगण्यात आले़ तर डॉक्टरला आणण्यासाठी ग्रामीण रूग्णालयाच्या गाडीत डिझेल नाही, चालक नाही, असे सांगण्यात आले़ नातेवाईकांनी खाजगी वाहन करून येणेगूरच्या रूग्णालयात धाव घेतली तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येण्यास नकार दिला़ कायद्याच्या अडचणीमुळे प्रेत नातेवाईकांना नेताही येत नव्हते़ रात्री उशिरापर्यंत त्या प्रेतावर शवविच्छेदन न झाल्याने नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता़ (वार्ताहर)
शवविच्छेदनाला पाऱ्यातही विलंब
वाशी : वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाचा फटका मयतांनाही सोसावा लागत असल्याचे दिसत आहे़
डोंगरेवाडी (ता़वाशी) येथील एका ७० वर्षीय वृध्दाने आजारास कंटाळून गुरूवारी सकाळी आत्महत्या केली होती़ मात्र, पारा येथे शवविच्छेदन न झाल्याने वाशी ग्रामीण रूग्णालयात आणलेल्या मयताच्या पार्थिवावर दोन ते अडीच तास शवविच्छेदन होऊ न शकल्याने नातेवाईकांचीही हेळसांड झाली़ डोंगरेवाडी येथील विनायक चंद्रभान भराटे (७०) या वयोवृध्द इसमाने आजारपणास कंटाळून गुरूवारी सकाळी राहत्या घरी गळफ ास घेऊन आत्महत्या केली. डोंगरेवाडी येथील पोलीस पाटलांनी यासंदर्भात वाशी पोलिस ठाण्यात माहिती दिली होती़ त्यानंतर पोलीस हवालदार नितीन पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला़ त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्याचे प्रेत पारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले़ मात्र, डॉक्टरांच्या संपामुळे तेथे शवविच्छेदन होऊ शकले नाही़
त्यानंतर मयताचे पार्थिव वाशी येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले़ दीड ते अडीच तासानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.बोराडे यांनी शवविच्छेदन केले. वाशी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Pain is aggravated by suffering!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.