पोहनेरचा ग्रामसेवक एसीबीच्या सापळ्यात
By Admin | Updated: May 9, 2015 00:55 IST2015-05-09T00:31:12+5:302015-05-09T00:55:32+5:30
परळी : घराची पीटीआर नक्कल देण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच स्वीकारताना पोहनेर येथील ग्रामसेवक शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

पोहनेरचा ग्रामसेवक एसीबीच्या सापळ्यात
परळी : घराची पीटीआर नक्कल देण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच स्वीकारताना पोहनेर येथील ग्रामसेवक शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
राजेश्वर दत्तात्रय पाठक असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे. त्यांच्याकडे पोहनेरसह दिग्रस ग्रामपंचायतचा पदभार आहे. पोहनेर येथील भारत सखाराम गायकवाड यांना घराची पीटीआर नक्कल हवी होती. त्यासाठी त्यांनी ग्रामसेवक पाठक यांच्याशी गुरूवारी संपर्क साधला. पाठक यांनी नक्कल देण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच मागितली. त्यानंतर गायकवाड यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानुसार शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला. दुपारी पावणेतीन वाजता गायकवाड यांच्याकडून पाच हजार रूपये स्वीकारताच एसीबीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठक यांना झडप घालून रंगेहात पकडले. याप्रकरणी शहर ठाण्यात ग्रामसेवक पाठकविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उपअधीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनय बहीर, पोहेकाँ श्रीराम खटावकर, पोकाँ सुशांत सुतळे, योगेश नाईकनवरे यांनी कारवाई केली. (वार्ताहर)