पाडापाडी; बिल्डर रस्त्यावर
By Admin | Updated: December 8, 2014 00:23 IST2014-12-08T00:21:40+5:302014-12-08T00:23:58+5:30
औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेने चटई क्षेत्रा (एफएसआय)च्या नियमात न बसणाऱ्या कामांवर हातोडा चालवला

पाडापाडी; बिल्डर रस्त्यावर
औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेने चटई क्षेत्रा (एफएसआय)च्या नियमात न बसणाऱ्या कामांवर हातोडा चालवला असून, शनिवार आणि रविवारी कारवाई स्थगित असल्याने बिल्डरांनी प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर येऊन रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली अन् पोलिसांची धावपळ सुरू झाली. पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर आंदोलकांची पळापळ झाली. यावेळी पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेऊन सायंकाळी जामिनावर सोडले.
जयाजी अण्णासाहेब सूर्यवंशी, विशाल गजानन कुलकर्णी, राजेंद्र गजानन कुलकर्णी, नामदेव गणपत बाजड, अश्पाक अमीन, अजमतउल्ला पठाण, शेख अजहर, सय्यद अजहर स. युसूफ अशा आठ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सातारा परिसरात नगर परिषदेने धोकादायक ३५० नवीन इमारतधारकांना अनधिकृत बांधकाम दाखवून पाडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.
त्या नोटिसांना बिल्डरांनी केराची टोपली दाखवली होती. त्यांनी ग्रामपंचायतीने आतापर्यंत दिलेल्या नोटिशींनाही काही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे नगर परिषदेच्या नोटिशींनी काय होणार, असा गैरसमज बिल्डर लॉबीचा झाला होता; परंतु न्यायालय व जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्या आदेशाने सिंघम प्रशासक विजय राऊत यांनी नगर परिषदेच्या हद्दीतील धोकादायक व एफएसआयच्या नियमात न बांधलेल्या कामांवर हातोडा टाकला.
त्यांनी चार दिवसांच्या कालावधीत १२ अतिरिक्त बांधकामांवरील चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर ब्रेकर आणि हातोडा चालवून ते नष्ट केले. यामुळे बिल्डर लॉबीत प्रशासनाविषयी संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे त्यांनी ४ डिसेंबर रोजी निदर्शनासाठी परवानगी काढली होती, त्यावेळी काही कारणास्तव निदर्शने रद्द करण्यात आली; परंतु रविवारी सर्वांची कामे बंद असल्याने बिल्डर आणि कामगारांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले.
पगार मागायला आले अन् पोलिसांनी पकडून नेले...
सातारा-देवळाई नगर परिषदेच्या वतीने पाडापाडी सुरू झाल्याने बांधकामे बंद करण्यात आली, त्यामुळे कामगारांची उपासमार होत आहे.
रविवारी मजुरी घेण्यासाठी मजूर आणि फ्लॅटधारकही आता आमच्या घराचे काय, असे विचारण्यासाठी सातारा परिसरात आले होते, त्यांनीही आंदोलनात सहभाग नोंदविल्याने त्यांना अटक करून सायंकाळी जामिनावर सोडून दिले, असे पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले.
आम्ही स्वत:हून बांधकाम काढत आहोत...
सातारा-देवळाई परिसरात नगर परिषदेने हातोडा कारवाई सुरू केली असून, बहुतांश बिल्डर स्वत:च बांधकामे काढण्यासाठी सरसावले आहेत.
त्या प्रकारचे शपथपत्रही प्रशासनाकडे करून दिले आहे, असे बिल्डरच्या वतीने नामदेव बाजड व अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले. लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नियमानुसार हातोडा सुरूच राहील...
सातारा-देवळाई परिसरातील एफएसआयच्या नियमात नसलेल्या अतिरिक्त बांधकामांवर आदेशानुसार अतिक्रमण हटाव पथकाचा हातोडा सुरूच राहणार आहे, असे प्रशासक विजय राऊत यांनी सांगितले.