वीज जोडणीसाठी दलाल, मध्यस्थांशी संपर्क साधू नका
औरंगाबाद : महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ८ जिल्ह्यांत घरगुती, व्यापारी वीजजोडणीसाठी सिंगल फेज व थ्री फेज असे २६ हजार ५०० नवीन वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. वीज जोडणीसाठी दलाल, मध्यस्थांशी जनतेने संपर्क साधू नये. वीज ग्राहकांनी नवीन वीज जोडणीसाठी जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.
अवैध पार्किंग बंद करा
औरंगाबाद : शहरातील विविध रस्त्यांवरील अवैध पार्किंग बंद करण्यात यावी, अशी मागणी रिक्षाचालकांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर निसार अहेमद खान, कैलास शिंदे, मोहंमद फारूख, एस. के. खलील, रमाकांत जोशी, दत्ता नागरे, केशव गिरी यांची नावे आहेत.
तापमानात घट, पण उकाडा कायम
औरंगाबाद : उच्चांकी तापमानाची नोंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी शहरातील कमाल तापमानात किंचित घट झाली; परंतु उकाडा मात्र कायम आहे. चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान ३९.७ अंश सेल्सिअस इतक्या नोंदविले गेले.