ग्रामीणमधील २३ रुग्णालयांचे होणार ऑक्सिजन ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:05 IST2021-04-30T04:05:37+5:302021-04-30T04:05:37+5:30
औरंगाबाद : ग्रामीण भागातील ६ शासकीय तसेच १७ खासगी डेडिकेटेड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) येथील ऑक्सिजन सुविधेचे ऑडिट करण्याचे आदेश ...

ग्रामीणमधील २३ रुग्णालयांचे होणार ऑक्सिजन ऑडिट
औरंगाबाद : ग्रामीण भागातील ६ शासकीय तसेच १७ खासगी डेडिकेटेड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) येथील ऑक्सिजन सुविधेचे ऑडिट करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी २७ एप्रिलला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्यावतीने नेमलेल्या तालुका संपर्क अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या मदतीने पुढील चार दिवसांत ऑडिट पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी गुरुवारी दिल्या.
वेळेत ऑक्सिजन ऑडिट पूर्ण करण्यासाठी दहासदस्यीय समितीचे गठण अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. गणेश कल्याणकर, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, रामप्रसाद लाहोटी, प्रसाद मिरकले, शिवराज केंद्रे आदींचा या समितीत सहभाग आहे. तालुका संपर्क अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी डीसीएचसी, डीसीएचच्या नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून, विभागीय आयुक्तांनी ठरवून दिलेल्या सातपानी तक्त्यात रुग्णालयांच्या सर्व बाबींची पडताळणी करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या.
यावेळी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, डॉ. विजयकुमार वाघ यांच्यासह तालुका संपर्क अधिकारी उपस्थित होते. सध्याचा वापर आणि ऑडिटनंतरच्या ऑक्सिजनच्या वापराचीही माहिती रुग्णालयांकडून घेतली जाणार असल्याचे कवडे यांनी सांगितले.
---
ऑक्सिजनच्या खाटांबाबत वाॅररूम अनभिज्ञ
जिल्ह्यातील ग्रामीण भागात किती ऑक्सिजन बेडची उपलब्धता आहे, याबद्दल आरोग्य यंत्रणेकडे माहिती नाही. वाॅररूममध्ये याबद्दल विचारणा केली असता, केवळ सीसीसी डीएचओंच्या अखत्यारीत आहेत. डीसीएचसी, डीसीएच हे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अंतर्गत आहेत. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील असमन्वयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी असलेल्या वाॅररूमध्येही माहिती उपलब्ध नसल्याचे आढळून आले.