प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकऱ्याचा मुलगा बनला तहसीलदार
By Admin | Updated: April 15, 2016 01:46 IST2016-04-15T01:22:07+5:302016-04-15T01:46:59+5:30
करंजखेड : अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील तरुणाने आपले शालेय शिक्षण एकशिक्षकी शाळेत पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने आपले शिक्षण

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकऱ्याचा मुलगा बनला तहसीलदार
करंजखेड : अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील तरुणाने आपले शालेय शिक्षण एकशिक्षकी शाळेत पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने आपले शिक्षण पूर्ण करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तहसीलदार परीक्षेत घवघवीत यश मिळवले. कन्नड तालुक्यातील तलवाडी येथील रहिवासी असलेल्या या तरुणाने ग्रामीण भागातील तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
विक्रमसिंग राजपूत असे या यशवंताचे नाव आहे. १३ एप्रिल, वेळ दुपारची. तलवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला. अल्पभूधारक कुटुंबातील जन्मलेल्या विक्रमसिंगचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण गावातील एकशिक्षकी शाळेत झाले. पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण तलवाडीपासून जवळच असलेल्या करंजखेड येथील महाविद्यालयात झाले. त्यामुळे त्यास करंजखेड ते तलवाडी अशी रोज पायपीट करावी लागे. बारावीनंतर तो पुढील शिक्षणासाठी औरंगाबादेत दाखल झाला. खेड्यातून आलेली मुले शहरात आल्यास गोंधळून जातात. विक्रमसिंगला मात्र पदवीचे शिक्षण घेत असतानाच चांगले मित्र मिळाले. पदवीला असतानाच त्याने नोकरीच्या संधी शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यास लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन अधिकारी होता येत असल्याचे समजले आणि तो तेव्हापासून अभ्यासाला लागला. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार त्याने पुस्तकांची जमवाजमव केली. ध्येयाने झपाटलेल्या विक्रमने पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची राज्यसेवा ही परीक्षा उत्तीर्ण केली. लोकसेवा आयोगाने नुकताच राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. यात विक्रमसिंगची तहसीलदारपदी निवड केल्याचे आयोगाने घोषित केले. तलवाडी येथील अधिकारी होणारा विक्र मसिंग हा पहिलाच आहे. ही आनंदाची वार्ता गावकऱ्यांना कळताच त्यांनी प्रचंड जल्लोषात ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केले. गावातील महिलांनी त्याचे औक्षण केले.