वर्षभरात ३५८ गर्भवती बाधित, बाळ, बाळंतिणीची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:05 IST2021-04-13T04:05:21+5:302021-04-13T04:05:21+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यास वर्षभरापासून कोरोनाचा विळखा असून, गेल्या दोन महिन्यांत कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे. मुलांपासून ...

वर्षभरात ३५८ गर्भवती बाधित, बाळ, बाळंतिणीची कोरोनावर मात
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यास वर्षभरापासून कोरोनाचा विळखा असून, गेल्या दोन महिन्यांत कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे. मुलांपासून तर ज्येष्ठांनाही कोरोनाची लागण होत आहे. यात गर्भवती महिलांनादेखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत एकट्या घाटीत ३५८ कोरोनाबाधित गरोदरमातांनी उपचार घेतले. यातील १९७ महिलांची घाटीत प्रसूती झाली. सुदैवाने यातील ९९ टक्के बाळ कोरोनामुक्त राहिले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात गतवर्षी एप्रिलमध्ये कोरोनाबाधित महिलेची सिझेरियन प्रसूती झाली. नवजात मुलगी कोरोनामुक्त राहिली. अशा प्रकारची देशातील दुसरी आणि राज्यातील पहिलीच प्रसूती ठरली. नवजात शिशूला बाधित आईकडून संसर्ग होण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. या प्रसूतीच्या वेळीच नवजात शिशूंना कोरोनाचा धोका नसल्याचे, कोरोनाबाधित आईच्या दुधातून बाळाला कोरोना होत नसल्याचे स्पष्ट झाले. केवळ दूध पाजताना स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे असते. तसेच दूध पाजल्यानंतर बाळाला आईपासून दूर ठेवणे आवश्यक असते. घाटीत गेल्या वर्षभरात औरंगाबाद जिल्ह्यातील २९२ आणि अन्य जिल्ह्यांतील ६६ अशा एकूण ३५८ कोरोना पाॅझिटिव्ह गर्भवती उपचारासाठी आल्या. यातील अनेक महिला ३ ते ७ व्या महिन्यांतील गरोदर होत्या. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतर त्या घाटीतून रवाना झाल्या, तर काही महिलांची खासगी रुग्णालयांत प्रसूती झाली. घाटीत ३५८ पैकी १९७ महिलांची प्रसूती झाली.
-----
एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात आढळलेल्या बाधित गर्भवती
औरंगाबाद- २०६
फुलंब्री-११
गंगापूर-३५
कन्नड-१२
खुलताबाद-१
सिल्लोड-१४
वैजापूर-९
पैठण-४
----
गरोदरपणात कोरोनाबाधित झाले तरी महिलांनी घाबरू नये. कारण अशा परिस्थितीतही कोरोनाविरुद्धची प्रतिकारशक्ती असते. कोरोना झाला तरी बहुतांश प्रसूती नैसर्गिक होतात. क्वचित सिझेरियन प्रसूती होते. शिवाय योग्य खबरदारी घेऊन दूध पाजले तर बाळाला कोरोना होत नाही. अनेक कोरोनाबाधित गरोदर महिलांची कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रसूती झाली.
- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी.
---
गर्भवती महिला बाधित आल्यास
गर्भवती महिला बाधित आल्यास कोणतीही चिंता करण्यासारखी परिस्थिती नसते. ज्याप्रमाणे कोरोनाचे इतर रुग्ण उपचार घेतात, त्याचप्रमाणे त्यांनाही उपचार घ्यावे लागतात. गरोदरपणात कोरोनाची लक्षणे जाणवल्यास वेळीच तपासणी करून निदान करून घेणे गरजेचे असते. माता आणि बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही आजारांकडे दुर्लक्ष करू नये, असे तज्ज्ञांनी म्हटले.
----
प्रसूतीनंतर केवळ ३ बाळांना कोरोनाचे निदान
घाटीत प्रसूती झालेल्या कोरोनाबाधित महिलांच्या ९९ टक्के नवजात शिशूंना कोरोनाची लागण झाली नाही. घाटीत १९७ प्रसूती झाल्या. यात १३८ नैसर्गिक आणि ५९ सिझेरियन प्रसूती झाल्या. यात प्रसूतीनंतर केवळ ३ बाळांना कोरोनाचे निदान झाले. जन्मानंतर पाचव्या दिवशी या बाळांना कोरोनाचे निदान झाले, तर तीव्र ताप आणि रुग्णालयात उशिरा आल्याने ७ बाळांचा मृत्यू झाला. गरोदरपणात कोरोनाची लागण झाली, तरीही सिझेरियन करण्याची गरज नाही. नैसर्गिक प्रसूती शक्य आहे. कोरोना स्टेज- १ मध्ये असेल तर प्रसूतीवर कोणताही परिणाम होत नाही. याशिवाय स्टेज २ आणि ३ मधील गरोदरमातांचीही प्रसूती सुकर झाल्याचे घाटीत झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे.