बाह्य रूग्ण विभागात हाल, उशिराने येतात डॉक्टर
By Admin | Updated: April 8, 2017 00:22 IST2017-04-08T00:20:42+5:302017-04-08T00:22:06+5:30
जालना : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात बाह्य रूग्ण विभागात डॉक्टर उशिराने येत असल्याने रूग्णांचे हाल होत आहेत.

बाह्य रूग्ण विभागात हाल, उशिराने येतात डॉक्टर
जालना : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात बाह्य रूग्ण विभागात डॉक्टर उशिराने येत असल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. शुक्रवारी सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत स्टिंग आॅपरेशन केले असता बहुतांश विभागात डॉक्टर उपस्थित नव्हते. तर काही ठिकाणी कर्मचारी रूग्णांची तपासणी करीत असल्याचे दिसून आले.
जिल्हा रूग्णालयात रूग्णांना अल्पदरात उपचार मिळतात. त्यामुळे गोरी-गरीब जनता सकाळीच तपासणी येते. मात्र डॉक्टर उशिराने अथवा काही वेळा येत नसल्याचे रूग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शुक्रवारी जिल्हा रूग्णालयात सकाळी स्टिंग आॅपरेशन केले असता रूग्ण तासाभरापासून उपस्थित होते. मात्र डॉक्टर उपस्थित नव्हते. इतर कर्मचारीच रूग्णांची समजूत काढत असल्याचे चित्र होते. मेडिसिन म्हणून लिहिलेल्या आठ नंबर विभागात डॉक्टर नव्हते.मुख्य खुर्ची रिकामीच होती. एक महिला कर्मचारी दारावर काठी घेऊन बसलेल्या होत्या. नऊ नंबरमध्येही कोणीच नव्हते. या विभागाबाहेर पंधरा ते वीस रूग्ण उभे होते. सोनोग्राफी विभागातही डॉक्टर उपस्थित नव्हते. चार महिने रूग्ण येथे सोनोग्राफीसाठी प्रतीक्षेत होत्या. अस्थिव्यंग विभागातही कोणीच नव्हते. बाल रूग्ण विभागात डॉक्टर उपस्थित नव्हते. येथे चार ते पाच रूग्ण उपस्थित होते. असंसर्ग विभागातही डॉक्टर अथवा कर्मचारी आढळून आले नाही. सुमारे साडेदहापर्यंत अनेक रूग्णांना डॉक्टरांची प्रतीक्षा होती. इंजेक्शन, प्रेरणा प्रकल्पांत कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)