तीन प्राध्यापक परीक्षा प्रक्रियेतून बडतर्फ
By Admin | Updated: July 23, 2014 00:41 IST2014-07-23T00:31:11+5:302014-07-23T00:41:59+5:30
औरंगाबाद : ज्या केंद्रावर पत्नीने परीक्षा दिली, तेथे केंद्र संचालक म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकासह तिघा जणांना परीक्षा प्रक्रियेतून बडतर्फ करण्याचा निर्णय विद्यापीठ परीक्षा मंडळाने घेतला आहे.

तीन प्राध्यापक परीक्षा प्रक्रियेतून बडतर्फ
औरंगाबाद : ज्या केंद्रावर पत्नीने परीक्षा दिली, तेथे केंद्र संचालक म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकासह तिघा जणांना परीक्षा प्रक्रियेतून बडतर्फ करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा मंडळाने घेतला आहे.
आज मंगळवारी परीक्षा मंडळाची बैठक होती. या बैठकीत परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या तीन प्राध्यापकांना बडतर्फ करण्याचा ठराव चर्चेला आला. यात शिरसाळा, जिल्हा बीड येथील पंडित गुरू पार्डीकर कला महाविद्यालयातील एम.बी. धोंडगे हे मराठीचे प्राध्यापक आहेत. त्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात प्रा. धोंडगे यांच्या पत्नीने परीक्षा दिली. त्यावेळी त्यांनी परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून काम पाहिले. त्यामुळे प्रा. धोंडगे यांना परीक्षा प्रक्रियेतून बडतर्फ करण्यात आले. एका प्राध्यापकाने बीसीएसचे पेपर तपासताना जास्तीचे गुणदान केल्याचे निष्पन्न झाले. या तीन प्राध्यापकांवर ठपका ठेवून त्यांना परीक्षा प्रक्रियेतून बडतर्फ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
याशिवाय विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाचे मानकरी ठरवण्यासाठी डॉ. वाल्मीक सरवदे व डॉ. विलास खंदारे या दोन प्राध्यापकांची समिती स्थापन करण्यात आली.
सध्या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी श्रेणी पद्धत (ग्रेडिंग), तर महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गुणदान पद्धत अवलंबली जात आहे. मात्र, विद्यापीठातर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रमातील सुवर्णपदकाचा मानकरी ठरवण्यासाठी सध्या संभ्रम निर्माण झाला आहे.
‘पीईएस’ अभियांत्रिकीबाबत ठराव
पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘कॅस सेंटर’ काढून घेण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला असून, संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना नोटीस बजावली आहे. आजच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा ठराव चर्चेला आला तेव्हा त्या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.