शाळाबाह्य मुले येणार शिक्षणप्रवाहात

By Admin | Updated: August 7, 2014 01:46 IST2014-08-07T00:52:29+5:302014-08-07T01:46:49+5:30

संजय तिपाले , बीड शिक्षणप्रवाहापासून एकही विद्यार्थी बाहेर राहू नये, यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहेत़ एका विद्यार्थ्यामागे शासन १०५० रुपये खर्च करत आहे़

Out-of-school children will be educated | शाळाबाह्य मुले येणार शिक्षणप्रवाहात

शाळाबाह्य मुले येणार शिक्षणप्रवाहात



संजय तिपाले , बीड
शिक्षणप्रवाहापासून एकही विद्यार्थी बाहेर राहू नये, यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहेत़ एका विद्यार्थ्यामागे शासन १०५० रुपये खर्च करत आहे़ त्यामुळे शाळाबाह्य मुले पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जाणार आहेत़ जिल्ह्यात सुमारे ५ हजार ८९३ इतक्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे़
सर्व शिक्षा अभियानांतर्गत १ आॅगस्ट ते ३१ आॅक्टोबर २०१४ या दरम्यान हे प्रशिक्षण वर्ग भरविले जाणार आहेत़ मागील शैक्षणिक वर्षात ३० पेक्षा अधिक दिवस शाळेत गैरहजर राहिलेल्या व शाळेत कधीही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळाबाह्य म्हणून संबोधले जात आहे़ गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळाबाह्य मुलांची माहिती मागविली होती़ त्यानुसार जिल्ह्यात ५ हजार ८९३ इतकी मुले शाळाबाह्य असल्याचे समोर आले़ त्यांच्यासाठी १ आॅगस्टपासून संबंधित शाळांमध्येच प्रशिक्षण वर्ग सुरु झाले आहेत़ नियमित शिक्षकांवरच जबाबदारी निश्चित केली आहे़ शाळा सुरु होण्यापूर्वी एक तास व संपल्यावर एक तास असे दोन तास प्रशिक्षण वर्ग भरविले जात आहेत़ बहुतांश ठिकाणचे वर्ग सुरुही झाले आहेत़ या वर्गांचा नियमित आढावा घेतला जाईल, असे सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी व्ही़ एल़ राठोड यांनी सांगितले़
शिक्षकांनी खाजगी प्रशिक्षक नियुक्त केल्याचे आढळल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे़
अल्पोपहारही मिळणार
शाळाबाह्य मुलांना अल्पोपहार देण्याची तरतूद आहे़ पौष्टिक, प्रथिनेयुक्त व सकस आहार, फळे, बिस्कीट, कडधान्य दिले जाणार आहे़ अल्पोपहारासाठीचा निधी शिक्षण समिती व मुख्याध्यापक यांच्यामार्फत खर्च करावयाचा आहे़
६१ लाख रुपये खर्च
शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रयत्न आहेत़ शाळाबाह्य मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी एका विद्यार्थ्यावर १ हजार ५० रुपये खर्च केले जाणार आहेत़ १८० रुपयांची पुस्तके, १५० रुपये लेखन साहित्यासाठी तर अल्पोपहारासाठी ७२० रुपयांची तरतूद आहे़ जिल्ह्यातील ५ हजार ८९३ विद्यार्थ्यांसाठी ६१ लाख ८७ जार ६५० रुपये खर्च केले जातील, अशी माहिती सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी व्ही़ एल़ राठोड यांनी दिली़

Web Title: Out-of-school children will be educated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.