शाळाबाह्य मुलांची आकडेवारी चुकीची

By Admin | Updated: July 9, 2015 00:19 IST2015-07-09T00:19:48+5:302015-07-09T00:19:48+5:30

बीड : तुकड्या, शिक्षकांची पदे वाचविण्यासाठी, हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा आकडा फुगवून अनुदान लाटण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा खरा आकडा पुढे येऊ दिला जात नाही

Out of school boy child stats | शाळाबाह्य मुलांची आकडेवारी चुकीची

शाळाबाह्य मुलांची आकडेवारी चुकीची


बीड : तुकड्या, शिक्षकांची पदे वाचविण्यासाठी, हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा आकडा फुगवून अनुदान लाटण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा खरा आकडा पुढे येऊ दिला जात नाही. कालच्या सर्वेक्षणातही हेच घडले. त्यामुळे जिल्ह्यात ८० हजार तर राज्यात १० लाख मुले सर्वेक्षणापासून दूर राहिल्याचा आरोप शाळाबाह्य मुलांसाठीच्या कृती गटाचे सदस्य दीपक नागरगोजे यांनी केला.
बुधवारी येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कृती गटाने सुचविलेल्या शिफारशी देखील डावलल्याचा घणाघात केला. कृती गटाने नमूद केलेले मुद्दे ऐनवेळी प्रपत्रात घेतले नाहीत. त्यामुळे बीडमध्ये केवळ १३१२ तर राज्यात ५१ हजार शाळाबाह्य मुलांचा समोर आलेला आकडा विश्वसनीय नाही, असे ते म्हणाले.
६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण ४ जुलै रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या दरम्यान करायचे होते. मात्र, सर्वेक्षणातील अधिकारी, कर्मचारी १२ तास कर्तव्यावर नव्हते, असा दावाही त्यांनी केला. शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेले सर्वेक्षण संशयास्पद असून त्रयस्थांमार्फत ते झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यात स्थलांतरित होणाऱ्या लाखो उसतोड मजुरांच्या पाल्यांची संख्या ८० हजारांहून अधिक आहे. मात्र, केवळ १३१२ शाळाबाह्य मुले असल्याचा जावईशोध सर्वेक्षणातून समोर आला. स्थलांतरित मजुरांच्या पाल्यांची नोंद सर्वेक्षणात व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. आता केलेले सर्वेक्षण रद्द करून नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात करण्यात यावे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Out of school boy child stats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.