पालकमंत्री बाहेरचाच!
By Admin | Updated: December 7, 2014 00:19 IST2014-12-07T00:15:16+5:302014-12-07T00:19:59+5:30
औरंगाबाद :बाहेरचाच मंत्री पालकमंत्री म्हणून मिळण्याची दाट शक्यता असून दिवाकर रावते किंवा अर्जुन खोतकर यांच्याकडे ती जबाबदारी जाईल, अशी चर्चा सेनेच्या गोटातून ऐकावयास मिळाली आहे.

पालकमंत्री बाहेरचाच!
औरंगाबाद : शहर व जिल्ह्याला यावेळीही बाहेरचाच मंत्री पालकमंत्री म्हणून मिळण्याची दाट शक्यता असून दिवाकर रावते किंवा अर्जुन खोतकर यांच्याकडे ती जबाबदारी जाईल, अशी चर्चा सेनेच्या गोटातून ऐकावयास मिळाली आहे. खोतकर यांची शुक्रवारी मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. मात्र, पुढच्या विस्तारात त्यांची वर्णी लागेल, असे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले.
जिल्ह्यात शिवसेनेचे ३, भाजपाचे ३ आमदार आहेत. सभापती हरिभाऊ बागडे वगळता कुणालाही लालदिवा मिळाला नाही. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर स्थानिक तिघांपैकी एकाला मंत्रिपद मिळेल आणि पालकमंत्री म्हणून वर्णी लागेल, अशी शक्यता होती. मात्र, पालकमंत्री बाहेरचाच मिळण्याच्या शक्यतेमुळे मागील १५ वर्षांपासूनचा वनवास आताच संपणार नाही, असे
दिसते.
गंगापूरचे आ. प्रशांत बंब, शहरातील पूर्व मतदारसंघातील अतुल सावे, विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे हे भाजपाचे, तर पश्चिम मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट, कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव, पैठण आ. संदीपान भुमरे यांच्यापैकी सावे, शिरसाट, बंब यांची नावे चर्चेत होती. यापैकी एकाचीही वर्णी मंत्रिमंडळात लागली नाही.
आ. शिरसाट, सावेंची संधी हुकली
आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी शक्यता होती. मात्र, या दोघांनाही संधी मिळालेली नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात खा. खैरे यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे आ. शिरसाट यांची संधी हुकल्याचे कळते. खैरे यांना मंत्रिपद मिळाले, तर ते मराठवाड्यासाठी फायदेशीर ठरेल, असे पक्षप्रमुखांना वाटत आहे. त्यामुळेच आ. शिरसाट यांचा पत्ता कट झाल्याचे दिसते, तर भाजपाकडून सावे यांचे नाव चर्चेत होते; परंतु पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि चार- चार वेळा निवडून आलेल्यांच्या मोठ्या यादीत सावेंचा क्रमांक लागला नाही. त्यामुळे त्यांची संधीही हुकली आहे.
युती शासनाच्या काळात चंद्रकांत खैरे यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. १९९९ नंतर माजी मंत्री पतंगराव कदम हे पालकमंत्री होते. त्यानंतर आ. व्ही.के. पाटील हे पालकमंत्री राहिले. त्यानंतर आ. बाळासाहेब थोरात यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.
खैरे वगळता स्थानिक मंत्री पालकमंत्री म्हणून शहराला लाभला नाही. परिणामी, शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात खीळ बसली आहे. शहरातील कुठल्याच आमदाराला मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे यावेळीही पालकमंत्री बाहेरचाच येणार हे स्पष्ट आहे.