१७ पैकी १२ प्रकल्प अद्यापही कोरडेच
By Admin | Updated: July 4, 2014 00:20 IST2014-07-03T23:59:38+5:302014-07-04T00:20:26+5:30
किनवट : जून महिना संपला तरी पाऊसच नसल्याने १७ पैकी १२ प्रकल्प अद्यापही कोरड्याच अवस्थेत आहेत़

१७ पैकी १२ प्रकल्प अद्यापही कोरडेच
किनवट : जून महिना संपला तरी पाऊसच नसल्याने १७ पैकी १२ प्रकल्प अद्यापही कोरड्याच अवस्थेत आहेत़ सद्यघडीला केवळ ७ टक्केच जलसाठा प्रकल्पात असल्याने कधी नव्हे एवढी भयानक परिस्थिती यंदा निर्माण झाल्याचे चित्र आहे़ गतवर्षी जूनअखेर १७ पैकी ६ प्रकल्प शंभर टक्के भरले होते़ यंदा त्याउलट तालुक्यात परिस्थिती आहे़
तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान १ हजार २४० मि़मी़ इतके आहे़ गतवर्षी जूनअखेर ३८३ मि़मी़ पाऊस बरसला होता़ त्यामुळे नागझरी, लोणी हे दोन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले होते़ तर सिरपूर, वरसांगवी, पिंपळगाव (कि़), अंबाडी हे लघू व बृहद प्रकल्पही तुडुंब भरले होते़ मोठा पाऊस होवूनही प्रकल्प उभारणीत गैरव्यवहार झाल्याने कुपटी व नंदगाव हे दोन प्रकल्प कोरड्या अवस्थेतच राहतात़ डोंगरगाव मध्यम प्रकल्प ५५ टक्के, पिंपळगाव -५३़५०, सावरगाव १८१, हुडी २२़२२, सिंदगी २५़६६, जलधरा ३७़७६, निचपूर ७८़०६, थोरा २५़७२, मुळझरा ४़५२ टक्के भरले होते़
यंदा जूनअखेर केवळ ३२ मि़मी़ इतका पाऊस झाल्याने सिरपूर, वरसांंगवी, सावरगाव, अंबाडी, हुडी, सिंदगी, जलधरा, निचपूर, थोरा, मुळझरा व नेहमीचे कुपटी, नंदगाव हे १२ प्रकल्प सद्यघडीला कोरड्या अवस्थेत आहेत़
तर नागझरी २९़१६, लोणी ३२़२८, डोंगरगाव केवळ ३़८३, पिंपळगाव (कि़) ४९़८८, पिंपळगाव ७ टक्के इतकाच जलसाठा आहे़ तर मांडवी प्रकल्पात २९८़६० व निराळा प्रकल्पात ३१६़६५ टक्के इतकी पातळी आहे़ यंदा प्रकल्पातील जलसाठा पाहता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़ (वार्ताहर)