आपला ‘हात’ भारी, हाताची साथ ‘लय भारी’

By Admin | Updated: October 12, 2014 00:39 IST2014-10-12T00:39:23+5:302014-10-12T00:39:23+5:30

औरंगाबाद : धीरगंभीर आवाज उमटताच, जमलेल्या हजारो महाविद्यालयीन तरुण, तरुणी, आबालवृद्ध, महिलांमधून ‘माऊली-माऊली’चा जल्लोष झाला.

Our 'arms' heavy, with hand 'rhythm heavy' | आपला ‘हात’ भारी, हाताची साथ ‘लय भारी’

आपला ‘हात’ भारी, हाताची साथ ‘लय भारी’

औरंगाबाद : ‘आपला ‘हात’ भारी
हाताची साथ भारी
बाकी सर्व विसरून जा
आपले बाबूजीच लय भारी
आपला मराठवाडा लय भारी
आपला महाराष्ट्र लय भारी....’
असा त्याचा धीरगंभीर आवाज उमटताच, जमलेल्या हजारो महाविद्यालयीन तरुण, तरुणी, आबालवृद्ध, महिलांमधून ‘माऊली-माऊली’चा जल्लोष झाला. भरउन्हातही शेकडो कॅमेऱ्यांचे फ्लॅश चकाकले, हजारो हात उंचावत मोबाईलमध्ये त्याची छबी टिपण्यासाठी धडपडू लागले.
मराठवाड्याचा भूमिपुत्र रितेश येणार, अशी शनिवारी सकाळपासूनच तोंडोतोंडी चर्चा होती. आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी भरदुपारी उन्हात सिडको भागातील कामगार चौक ते गजानन महाराज मंदिरपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा तरुणाईने गर्दी केली होती. त्यांची दोन तासांची उत्साही प्रतीक्षा संपली अन् रुपेरी पडद्यावरील सुपर स्टार रितेश देशमुख हाती ‘पंजा’ घेऊन तरुणाईत दाखल झाला, तेव्हा एकच जल्लोष झाला. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा, करण दर्डा, अनिल इरावने, दामूअण्णा शिंदे, बबन डिडोरे पाटील आदी मंडळी रितेश देशमुखसह उघड्या गाडीत स्वार होऊन हजारो चाहत्यांना अभिवादन करीत होती.
रितेशने उडविली धम्माल
राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारार्थ सिडको कामगार चौकातून रितेश देशमुख याच्या ‘रोड शो’ला प्रारंभ झाला तेव्हा रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. इमारतीच्या छतावर थांबलेले लोक रितेशला हात उंचावून प्रतिसाद देत होते. हजारो मोबाईल चकाकत होते. रितेशला कॅमेराबंद करण्यात तरुणीही मागे नव्हत्या. सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले होते. त्यात ‘बाबूजी जिंदाबाद- आयेगा भाई आयेगा पंजावाला आयेगा’चा न थांबणारा जयघोष सुरू होता. जयभवानीनगर, पुंडलिकनगर व गजानन महाराज मंदिर चौक आदी ठिकाणी थांबून रितेश देशमुखने ‘तंटा नाय तर- घंटा नाय’सह अनेक संवाद ऐकवून, चाहत्यांना खुश केले. काही ठिकाणी तर रितेशने ‘तंटा नाय तर’ असे उच्चारताच उपस्थित हजारो उत्साही तरुणांनी ‘घंटा नाय’ असा प्रतिसाद दिला. सोबतच ‘माऊली- माऊली’ असे चिअरिंग करीत वातावरणात रंग भरले.
राजेंद्र दर्डा अन् रितेश... किती ही क्रेझ...
सुपर स्टार रितेश देशमुख व राजेंद्र दर्डा यांची क्रेझ जबरदस्त असल्याची प्रचीती या ‘शो’ने दिली. रितेश देशमुख व राजेंद्र दर्डा स्वार होते त्या वाहनावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.
निकम गुरुजींचा उत्साह
या ‘रोड शो’मध्ये ८२ वर्षीय निकम गुरुजीही सहभागी झाले होते. एका हाताने पंजाचे कटआऊट उंच करून ते सर्वांना दाखवीत होते व ‘पंजा... पंजा... पंजा...’ असे म्हणत लोकांना आकर्षित करीत होते. ते तरुणांच्या बरोबरीने तेवढ्याच जोशात पायी चालत होते... त्यांच्यातील प्रचंड उत्साह पाहून सर्व जण चकित झाले.
तरुणांसोबत महिला, वृद्धांचाही उत्साह वाखाणण्याजोगा
या ‘रोड शो’मध्ये तरुण-तरुणीच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक ज्येष्ठ महिलांनी उमेदवार राजेंद्र दर्डा व अभिनेता रितेश देशमुख यांचे हार घालून व फुलांची उधळण करून स्वागत केले. माऊलीने आमच्या गळ्यात हार घालून आशीर्वाद दिले. आम्ही धन्य झालो, अशी भावना रितेशने व्यक्त करताच सर्वांनी ‘माऊली... माऊली...’ असा जयघोष केला.
दर्डा-देशमुख कुटुंबियांचा स्नेह...
‘माझे वडील आदरणीय विलासराव देशमुख व राजेंद्र दर्डा परिवाराचे जुने स्नेहसंबंध आहेत. मराठवाड्याचा असल्याचा मला अभिमान आहे. जातीचे राजकारण काँग्रेसने कधीही केले नाही. सर्वधर्मसमभावाची सतत पाठराखण केली. म्हणूनच आम्ही काँग्रेससोबत आहोत. म्हणूनच युवकांनो जोश कायम ठेवा, हातावर मतांचा आशीर्वाद ठेवा. बाबूजी विजयी झाले की, मी तुमच्या भेटीला परत येईन...’
‘लय भारी’ प्रेम दिलं...
‘मी सर्वांचा अत्यंत आभारी आहे. तुम्ही लय भारी प्रेम दिलं. माऊलीला प्रेम दिलं. एका माऊलीनं येऊन पुष्पहार घातला. मी भारावलो.’
भूलथापांना बळी पडू नका...
‘येत्या १५ तारखेला हाताचे बटन दाबा. भूलथापांना बळी पडू नका. आपला हात भारी, त्याची साथ भारी, आपले बाबूजी लय भारी...’
छत्रपतींना नमन करून सांगतो...
‘मी छत्रपतींना नमन करून सांगतो की, मराठवाड्याने धडाडीचे नेते दिले. राजेंद्रबाबूजी मोठे नेते आहेत. आपल्याला अभिमान वाटावा, असे. त्यांनी केलेल्या विकासकामांबद्दल मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यांना विजयी करून आपला ‘हात’ भारी ठेवा. मताधिक्याचा नवा पॅटर्न ‘औरंगाबाद पॅटर्न’ तयार करा. तंटा नाय तर घंटा नाय...’
रितेश सेल्फी घेतो तेव्हा...
या ‘रोड शो’ला उदंड प्रतिसाद लाभला. नेतेमंडळी स्वार झालेल्या गाडीच्या मागे व पुढेही प्रचंड गर्दी होती. एका वळणावर येताच या गर्दीसह आपली छबी टिपण्याचा मोह रितेशला आवरला नाही. त्याने आपल्या मोबाईलमधून राजेंद्र दर्डा, ऋषी दर्डा, करण दर्डा यांच्यासह एक सेल्फी काढून घेतला.
क्षणचित्रे
1रितेशला पाहण्यासाठी १ वाजेपासूनच कामगार चौकात गर्दी जमणे सुरूझाले होते.
2तरुणच नव्हे तर तरुणी व महिलांनीही प्रचंड गर्दी केली होती.
3चाहते रस्त्यावर, ओट्यावर, गॅलरीत, गच्चीवर उभे राहून रितेशला डोळे भरून पाहत होते.
4बहुतेक मोबाईल कॅमेऱ्यात रोड शोची शूटिंग घेत होते.
5‘माऊली... माऊली’ सोबत ‘पंजा... पंजा,’ असा उत्स्फूर्त जयघोष केला जात होता.
6‘आपला हात भारी, हाताची साथ भारी, बाबूजी तर ‘लय भारी’ असा डायलॉग रितेशने मारताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
7आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
8अनेक ठिकाणी वृद्ध महिलांनी राजेंद्र दर्डा व रितेश देशमुखचे स्वागत केले.
9‘बाबूजी तुम आगे बढो, हम तुमारे साथ हैं,’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.
10औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील मतदारांनी प्रचंड गर्दीतही शिस्तीचे दर्शन घडविले.
चौकाचौकांतून जल्लोष झाला. झिरमिळ्यांचे फटाके फोडण्यात आले. ढोलताशे वाजविले जात होते. तरुण- तरुणी हस्तांदोलनासाठी धडपडत होते. ८ वर्षांच्या चिमुरडीपासून तरुण, मध्यमवयीन आणि ८० वर्षीय आजीबार्इंनीसुद्धा पुष्पहार घालून या जोडगोळींचे उत्स्फूर्त स्वागत केले. पुंडलिकनगर चौकात कांतीलाल निरपगार व त्यांच्या सहकाऱ्यांनी भलामोठ्या पुष्पहाराने रितेश देशमुख, राजेंद्र दर्डा यांचे स्वागत केले.

Web Title: Our 'arms' heavy, with hand 'rhythm heavy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.