उस्मानाबादकरांची थांबली वणवण !
By Admin | Updated: October 5, 2014 00:48 IST2014-10-05T00:46:11+5:302014-10-05T00:48:31+5:30
उस्मानाबाद : शहरामध्ये २०१२-१३ मध्ये निर्माण झालेल्या भीषण टंचाईचे चित्र डोळ्यासमोर आल्यानंतर आजही अशी परिस्थिती पुन्हा कधीही ओढावू नये

उस्मानाबादकरांची थांबली वणवण !
उस्मानाबाद : शहरामध्ये २०१२-१३ मध्ये निर्माण झालेल्या भीषण टंचाईचे चित्र डोळ्यासमोर आल्यानंतर आजही अशी परिस्थिती पुन्हा कधीही ओढावू नये, असे वाटल्यावाचून राहत नाही. मात्र शहरामध्ये उजनी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आणि टंचाईचा काळोख दूर झाला. २० ते २५ दिवसाला मिळणारे पाणी आज चार दिवसाआड मिळू लागले आहे. हातलादेवीच्या पायथ्याशी नव्याने पंपहाऊस उभारण्यात येणार आहे. सदरील यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर उस्मानाबादकरांना दररोज मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सदरील यंत्रणा अवघ्या येत्या सहा महिन्यात कार्यान्वित होईल, असे नगराध्यक्ष सुनील काकडे यांनी सांगितले.
उस्मानाबाद शहरामध्ये २०१२-१३ यावर्षातील उन्हाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. शहराच्या आजूबाजूचे प्रकल्प कोरडेठाक पडले होते. पालिकेच्या कुपनलिकांनीही दम तोडला होता. त्यामुळे शहरामध्ये पाण्याचे संकट अधिकच गंभीर बनले होते. शहरामध्ये तब्बल २० ते २२ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत होता. तोही अत्यल्प. खाजगी टँकरचे दरही गगनाला भिडले होते. ५०० लिटर पाण्यासाठी १०० ते १५० रुपये मोजावे लागत होते. येथेही वेटींग असे. ही समस्या लक्षात घेवून नगर परिषदेने उजनी पाणी पुरवठा योजनेला गती देण्यासाठी तातडीने प्रयत्न करुन शासनाकडे निधीची मागणी केली होती. तत्कालीन आघाडी शासनाने सढळ हाताने निधी दिला. आणि योजनेचे कामही युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यामुळे शहराची भीषण पाणी टंचाईच्या जोखडातून मुक्तता झाली. आजघडीला उस्मानाबादच्या जवळपास सर्वच भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. उजनी धरणातून प्रत्येक दिवशी ४० ते ५० लाख लिटर पाणी उचलले जात आहे.
दरम्यान, शहराला दररोज पाणी पुरवठा व्हावा यासाठी पालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. हातलादेवीच्या पायथ्याशी कायमस्वरुपी संपहाऊस उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पंपाची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेद्वारे पूर्ण क्षमतेने म्हणजेच ८ टीएमसी पाणी उचलता येणार आहे. त्यानंतर शहराला दररोज पाणीपुरवठा करता येईल, असे सांगण्यात येते. नगर परिषदेकडून संपहाऊस बांधकामासाठीची निविदा मागील काही दिवसापूर्वी काढण्यात आली असून, हे काम येत्या सहा महिन्यामध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.
एकंदरीतच उजनी पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर झाल्यामुळे आज उस्मानाबाद शहर १९ एप्रिल २०१३ रोजी टँकरमुक्त झाले. तेव्हापासून ते आजतागायत पालिका प्रशासनावर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली नाही. यामुळे कोट्यवधीचा खर्चही वाचला असल्याचे नगराध्यक्ष सुनील काकडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)