मतदार नोंदणीसाठी रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन
By Admin | Updated: September 11, 2014 01:10 IST2014-09-11T00:50:00+5:302014-09-11T01:10:10+5:30
औरंगाबाद : जिल्हा प्रशासनातर्फे येत्या रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे.

मतदार नोंदणीसाठी रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन
औरंगाबाद : जिल्हा प्रशासनातर्फे येत्या रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे यादीत नाव नसलेल्यांना रविवारी घराजवळील मतदान केंद्रांवर जाऊन स्वत:चे नाव नोंदविता येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.
लोकसभेची निवडणूक झाल्यापासून जिल्ह्यात सातत्याने मतदार नोंदणी मोहीम राबविली जात आहे. १ जून ते ३० जुलै या काळात व्यापक प्रमाणावर मतदार नोंदणी मोहीम राबविली गेली. त्यानंतरही काही रविवारी मतदान केंद्रांवर नोंदणी अर्ज स्वीकारण्यात आले. त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
परिणामी लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत जिल्ह्यात ८९ हजार मतदारांची भर पडली आहे.
आता विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. तरीदेखील राहिलेल्यांना नोंदणी करता यावी यासाठी येत्या रविवारी पुन्हा एकदा जिल्ह्यात सर्वत्र मतदार नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर दिवसभर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बसणार आहेत. त्यांच्याकडे नोंदणीचे अर्ज उपलब्ध असणार आहेत. हे अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह तिथेच स्वीकारलेही जातील.
प्रिंटर आणण्यासाठी पथक रायपूरला
जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये यावेळी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्याची खातरजमा करता येणार आहे. मतदान यंत्रावरील बटन दाबल्यानंतर लगेचच त्यातून मतदानाचा हक्कबजावल्याची प्रिंट बाहेर येईल; पण ही प्रिंट मतदाराला मिळणार नाही तर ती काही वेळ दिसून नंतर खाली ठेवलेल्या बॉक्समध्ये पडेल. त्यासाठी अत्याधुनिक स्वरूपाची मतदान यंत्रे आणण्यात आली आहेत. आता या यंत्रांना जोडण्यासाठी रायपूर येथून प्रिंटर आणण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच औरंगाबादचे पथक छत्तीसगड राज्यातील रायपूरला रवाना झाले आहे. तेथून १९८५ प्रिंटर आणले जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.