दोन तलाठ्यांच्या निलंबनाचे आदेश
By Admin | Updated: December 15, 2015 23:42 IST2015-12-15T23:34:30+5:302015-12-15T23:42:09+5:30
गंगाखेड : तालुक्यातील २ तलाठीे दोषी आढळल्याने निलंबन करण्यात आले असून पूर्णा तालुक्यातील एका तलाठ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

दोन तलाठ्यांच्या निलंबनाचे आदेश
गंगाखेड : तालुक्यातील २ तलाठीे दोषी आढळल्याने निलंबन करण्यात आले असून पूर्णा तालुक्यातील एका तलाठ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश नुकतेच उपविभागीय अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी काढले आहेत.
पूर्णा तालुक्यातील फुलकळस सज्जाचे तलाठी रमेश घोडके हे सतत सज्जावर अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यावरून तहसीलदार पूर्णा यांच्या मार्फत तलाठी घोडके यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश १९ नोव्हेंबर २०१५ रोजी उपविभागीय अधिकारी रणवीरकर यांनी दिले होते. त्यावरून पुर्णा तहसीलदारांनी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यामध्ये घोडके दोषी आढळले. त्यानुसार त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्याजवळील पदभार दुसऱ्या तलाठ्याकडे देण्याच्या सूचना रणवीरकर यांनी केल्या आहेत.
दुसरे प्रकरण गंगाखेड तालुक्यातील आहे. डोंगरगाव शे. येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पुरवणी यादीत बोगस नावे टाकून ३ लाख ८८ हजार २१५ रुपयांच्या अनुदानाची रक्कम या सज्जाचे तलाठी आर.व्ही. कवठेकर यांनी उचल केल्याची तक्रार आली होती. त्यानुसार रणवीरकर यांनी या प्रकरणी नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले. चौकशीत शेतकऱ्यांच्या अनुदानात गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून २८ आॅक्टोबर रोजी तलाठी कवठेकर यांच्या निलंबनाचे आदेश रणवीरकर यांनी काढले. कवठेकर यांना पूर्णा तहसील कार्यालय हे मुख्यालय देण्यात आले आहे. कवठेकर यांचा पदभार तहसील कार्यालयातील महा-ई सेवा केंद्रातील तलाठी डी.ए. पाटील यांच्याकडे देण्याचे आदेश काढण्यात आले. कवठेकर यांच्याकडे आंतरवेली सज्जाचा अतिरिक्त पदभार होता. हा पदभार पाटील यांनी घेतला नाही. तसेच पाटील यांच्याकडे तहसील कार्यालयातील जमाबंदी २ चा असलेला पदभार इतरांकडे सोपविला नाही. त्यामुळे शासकीय आदेशाचे उल्लंघन केले. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या कारणास्तव पाटील यांना ५ डिसेंबर रोजी निलंबित करण्यात आले. या संदर्भातील आदेश उपविभागीय अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी काढले आहेत. या प्रकारामुळे तलाठ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रणवीरकर यांनी सर्व तलाठ्यांना सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या अडचणी दूर करण्याचे आदेश दिले आहेत.