तीन कंपन्यांचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश
By Admin | Updated: May 17, 2016 00:33 IST2016-05-17T00:16:14+5:302016-05-17T00:33:41+5:30
वाळूज महानगर : प्रदूषण वाढविणाऱ्या व सांडपाण्यावर सीईटीपी प्रकल्पात प्रक्रिया न करणाऱ्या वाळूज औद्योगिक परिसरातील तीन कंपन्यांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश

तीन कंपन्यांचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश
वाळूज महानगर : प्रदूषण वाढविणाऱ्या व सांडपाण्यावर सीईटीपी प्रकल्पात प्रक्रिया न करणाऱ्या वाळूज औद्योगिक परिसरातील तीन कंपन्यांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावले आहेत. निर्धारित मुदतीत प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना न राबविल्यास या कंपन्यांचे उत्पादन कायमस्वरूपी बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
अनेक कंपन्या चोरी-छुपे एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर घातक रसायनांची विल्हेवाट लावत असल्याचे वृत्त लोकमतने गत महिन्यात प्रकाशित केले होते. यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले, क्षेत्र अधिकारी स्नेहल कोचे, कल्याणी झाडपिडे आदींच्या पथकाने १८ एप्रिल व ७ मे रोजी ठिकठिकाणी पाहणी केली.
या पाहणीत सांडपाण्याचे नमुने तपासणी घेऊन दोषी कंपन्यांचे उत्पादन बंद करण्याची तंबी कारखानदारांना देण्यात आली. पथकाने ७ मे रोजी वाळूज एमआयडीसीतील पूजा इंजिनिअरिंग (प्लॉट नंबर एफ-७५), धनलक्ष्मी इंटरप्रायजेस (प्लॉट नंबर-एफ-७५) व सार इंडस्ट्रीज (प्लॉट क्रमांक- एम.-१९) येथे पाहणी केली. या कंपन्यांत प्रदूषण रोखण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे दिसून आले. घातक रसायनयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडले जात होते. (पान २ वर)
अहवालानंतर उर्वरित कंपन्यांवर कारवाई
१८ एप्रिल रोजी मंडळाने केलेल्या पाहणीत कृष्णा इंडस्ट्रीज (प्लॉट नंबर एम.१०८/१३) या कारखान्यातील सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याचे दिसून आले होते. ठिकठिकाणच्या सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच संबंधित कारखान्यावरही पाणी व वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.