विभागप्रमुखांना मुक्कामी राहण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 23:28 IST2016-03-04T23:22:45+5:302016-03-04T23:28:16+5:30
नांदेड : दुष्काळाने होरपळलेल्या गावात जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांना महिन्यातून किमान पाच मुक्काम करण्याचे आदेश देण्यात आल आहेत़

विभागप्रमुखांना मुक्कामी राहण्याचे आदेश
नांदेड : दुष्काळाने होरपळलेल्या गावात जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांना महिन्यातून किमान पाच मुक्काम करण्याचे आदेश देण्यात आल आहेत़ संबंधित गावातील समस्यांची सोडवणूक करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत़ यासंदर्भात कासराळी ता़ बिलोली येथे झालेल्या स्थायी समितीच्या सभेत निर्णय घेण्यात आला़
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा प्रथमच मुख्यालयाबाहेर कासराळी येथे घेण्यात आली़ सभेला अध्यक्ष मंगला गुंडले, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, सभापती स्वप्निल चव्हाण, सभापती संजय बेळगे, सभापती दिनकर दहिफळे , मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासह सर्व स्थायी समितीचे सदस्य व विभागप्रमुख, अधिकारी यांची उपस्थिती होती़
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्यांची पाहणी करून त्यावर निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची सभा प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात आली़ स्थायी सभेत सर्व विभागप्रमुखांना महिनाभरात ग्रामपंचायतीच्या ठिकाणी पाच मुकामी राहण्याचे आदेश देण्यात आले़ पाणीटंचाई, शिक्षण, आरोग्य, कृषी, रस्ते या विषयावर संबंधित विभाग प्रमुख गावात जाऊन नागरिकांसोबत चर्चा करतील़ तसेच संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी उपाय योजना करतील़ दुष्काळकाळात ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा उपक्रम राबवून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जि़ प़ उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी दिली़
स्थायी सभा प्रथमच बाहेर घेण्यात आल्याबद्दल दिलीप धोंडगे म्हणाले, ग्रामीण भागातील प्रश्न घेऊन नागरिक जिल्हा परिषदेत येतात़ मात्र जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारीच आता जनतेच्या दारी जाऊन त्यांचे प्रश्न सोडविणार आहेत़ त्यामुळे कोणताही बिनकामाचा खर्च न करता कासराळी येथे पहिली सभा घेण्यात आली़ यापुढील सभा कंधार तालुक्यातील बाचोटी येथे होणार असल्याचेही ते म्हणाले़ दरम्यान, कासराळी येथे झालेल्या सभेत सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला़ त्यानंतर नवनिर्वाचित स्थायी सदस्यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला़ पाणीटंचाईवर चर्चा करून तहानलेल्या गावांना तातडीने पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले़ समाजकल्याण विभागातील दलित वस्तीच्या निधीसंदर्भात समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांना विचारणा करण्यात आली़ वैयक्तिक लाभाच्या ४ कोटींच्या निधी वितरणावरूनही पदाधिकाऱ्यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ (प्रतिनिधी)