सप्टेंबरपर्यंतचा पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्याचे आदेश
By Admin | Updated: July 4, 2014 00:19 IST2014-07-03T23:30:46+5:302014-07-04T00:19:01+5:30
जालना : जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी टंचाई आराखडा तातडीने तयार करावा, असे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी बजावले आहेत.

सप्टेंबरपर्यंतचा पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्याचे आदेश
जालना : भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, म्हणून जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी टंचाई आराखडा तातडीने तयार करावा, असे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी बजावले आहेत.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी दुपारी टंचाईसदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नायक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खास बैठक आयोजित केली. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतेवार यांच्यासह उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे व इतर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तसेच भविष्यातील पाणीटंचाई या अनुषंगाने जिल्हाधिकारी नायक यांनी तपशीलवार आढावा घेतला. तसेच जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी तातडीने पाणीटंचाईचा आराखडा तयार करावा, अशा सूचना बजावल्या. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे नायक यांनी नमूद केले. जिल्ह्यात ९० दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. परंतु भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना कराव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
सतत टँकर सुरू असलेल्या गावात भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सूचविलेल्या कामांसाठी शासनाकडून उपलब्ध निधीतून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. टंचाईच्या काळात मजुरांना काम मिळावे, म्हणून मागणीनुसार नवीन कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत, मजुरांची प्रलंबित मजुरी तात्काळ अदा करावी व नवीन कामे हाती घेताना जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.
या जिल्ह्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट व्हावे म्हणून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला आहे. परंतु त्या निधीचा अद्यापपर्यंत म्हणावा एवढा विनियोग झाला नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या गोष्टीची दखल घ्यावी व पाण्याच्या स्त्रोत बळकटीकरणासाठी तातडीने हालचाली कराव्यात, असे नायक यांनी म्हटले. यावेळी अन्य अधिकाऱ्यांनी विभागनिहाय अहवाल सादर केला. (प्रतिनिधी)
अनधिकृत पाणी उपशाविरुद्ध संयुक्त कारवाईची सूचना
प्रकल्पातील अवैध पाणी उपसा होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणेने प्रकल्प क्षेत्रातील कृषीपंपांचा वीजपुरवठा तोडण्याची मोहीम हाती घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहेत.गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पातील अल्पशा पाणीसाठ्यातूनही मोठ्या प्रमाणावर उपसा होत आहे.
अपूर्ण पाणीपुरवठा नळयोजना पूर्ण करण्यासाठी तसेच पूर्ण झालेल्या योजनांसाठी महावितरण कंपनीने तात्काळ विद्युत जोडणी द्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहेत.
तालुकानिहाय आढावा सादर होणार
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीनंतर संबंधित यंत्रणांनी तालुकानिहाय आढावा घ्यावा, असे आदेशसुद्धा प्रशासनाने बजावले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात अपुरा पाऊस झालाा आहे. या पार्श्वभूमीवर काही तालुक्यांमधून तीव्र टंचाई भासेल, असा अंदाज व्यक्त होतो आहे. त्यामुळेच सरकारी यंत्रणेने या गोष्टीची गांभिर्याने दखल घ्यावी, असे प्रशासनाने बजावले.