‘एसई’कडून चौकशीचे आदेश

By Admin | Updated: October 31, 2014 00:34 IST2014-10-31T00:18:18+5:302014-10-31T00:34:13+5:30

संतोष धारासूरकर, जालना मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोकरदन रस्त्याने गेल्या दोन वर्षांत ३६ जणांचे बळी घेतले. तर साठपेक्षा जास्त व्यक्तींना कायम जायबंदी केले आहे.

Order of inquiry by SE | ‘एसई’कडून चौकशीचे आदेश

‘एसई’कडून चौकशीचे आदेश



संतोष धारासूरकर, जालना
मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोकरदन रस्त्याने गेल्या दोन वर्षांत ३६ जणांचे बळी घेतले. तर साठपेक्षा जास्त व्यक्तींना कायम जायबंदी केले आहे.
गुळगुळीत रस्त्यावरील भरधाव वाहनांमुळे होणारे अपघात सर्वश्रूत आहेत. परंतु पूर्णत: खचलेल्या आणि उखडलेल्या फुटा-फूटावरील खड्डेमय कुख्यात भोकरदन रस्त्यावरील अपघातांच्या मालिकांनी जगावेगळी ख्याती निर्माण केली आहे. जागोजागीचे खड्डे, ते सुद्धा छोट्या- मोठया आकाराचे. ते चुकविण्याच्या नादात या रस्त्यावर गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात अपघात घडले आहेत. त्यातून ३६ जणांचा बळी व साठपेक्षा अधिक व्यक्ती जखमी किंवा जायबंदी झाले आहेत. रोजचे रडगाणे म्हणून सरकारी यंत्रणेने सुद्धा आता अपघातांच्या नोंदी ठेवणेही बंद केले आहे. पोलिस डायरींमधून काही घटनांची नोंद आहे. त्याआधारेच उपलब्ध माहितीवरून धक्कादायक अशा गोष्टी समोर आल्या आहेत.
या राज्य मार्गावरील बहुतांशी गावातील व्यक्तींचा अपघातामधून बळी गेला आहे. त्या व्यक्तींच्या स्मृती कुटूंबिय व ग्रामस्थ जोपासत आहेत. तर कायम जायबंदी झालेल्या व्यक्तींसह त्यांचे कुटुंबिय अपघातानंतर हतबल अवस्थेत जिणे जगत आहेत. उदाराणार्थ ढवळेश्वर (ता. जालना) येथील पाच व्यक्तींचा या रस्त्याने बळी घेतला. त्यात कमवती मंडळी गमवल्याने कुटूंबिय अद्यापही हादरलेल्या अवस्थेत आहेत. जालन्यापासून राजूर तेथून पुढे भोकरदनपर्यंतच्या या राज्य मार्गावरील छोट्या-मोठ्या खेड्यांमधूनही अशाच दर्दभऱ्या कहाण्या आहेत. या मार्गावरून दररोज अपडाऊन करणाऱ्या ग्रामस्थांसह कर्मचाऱ्यांच्याही व्यथा वेगळ्या आहेत. त्या सांगाव्या तरी कोणाला, असा प्रश्न या मंडळींसमोर उभा आहे. अनेकांना दररोजच्या आदळआपटीमुळे कमरेस, मानेला पट्टे लागले आहेत. या परिसरातील खेड्यापाड्यातील गर्भवती महिला, आजारी रूग्ण यांच्या गाथा, शोकांतिका तर विचारणेच नको, अशी भयावह स्थिती आहे.
जालना जवळील नूतनवाडी या भागात तीन महिन्यांपूर्वी एका खड्ड्यात मोटारसायकल आदळल्याने एक महिला खाली कोसळली. पाठोपाठ आलेल्या ट्रकचे चाक तिच्या अंगावरून गेल्याने महिलेचा मृत्यू झाला.
या खड्डेमय मार्गावर वाहने कमी वेगाने म्हणजेच २० ते ३० च्या स्पीडनेच चालवावी लागतात. गेल्या सहा महिन्यापूर्वी केदारखेडाजवळ झाडाझुडपात लपून बसलेल्या चोरट्यांनी खड्ड्यामुळे वेग मंदावलेल्या ट्रकला अडविले. चालकास बेदम मारहाण केले व लुटले. तर मानेदेऊळगावजवळ तीन महिन्यापूर्वीच ट्रक चालकावर गोळीबार झाला. (क्रमश:)
जालना- भोकरदन रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात लोकमतने गेल्या दोन दिवसांपासून मालिकेद्वारे टाकलेल्या प्रकाशझोताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या औरंगाबाद सर्कल विभागाच्या अधीक्षक अभियंता यु.के.अहिरे यांनी गुरुवारी दुपारी भोकरदन रस्त्याला भेट देऊन पाहणी केली.
४वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर खास बैठक घेऊन रस्त्याच्या दुरावस्थेसह आतापर्यत केलेल्या खर्चासंदर्भात तपशीलवार आढावा घेतला. कार्यकारी अभियंता तुपेकर यांच्यासह उपअभियंते व अन्य अभियंते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, अधीक्षक अभियंत्यांच्या दौऱ्यापाठोपाठ मुंबई येथील मंत्रालयातूनही तपशीलवार माहिती मागविण्यात आली आहे.
गेल्या तीन वर्षांत या राज्य मार्गावरील ७ व्यक्तींचे बळी घेतले तर २१ व्यक्ती जखमी झाल्या. राजूरपासून जालन्याकडील १० किलोमीटरच्या रस्त्यावर हे अपघात घडले आहेत. बाणेगाव पाटी, तपोवन पाटी या भागात ९ अपघात झाले. चांदई पिपरी पेट्रोल पंपासमोर खड्डे चुकवितांना ४०७ टेम्पोने उभ्या ट्रकला धडक दिली. त्यात चालक ठार. थिगळखेडा येथील एक लग्नाचे वऱ्हाड निघाले होते. वसंतनगरजवळ टेम्पो उलटला त्यात चौघे मृत्यू पावले. २० सप्टेंबर २०११ रोजी बसच्या धडकेने एक व्यक्ती राजूरजवळ जायबंदी झाला. तर ७ आॅगस्ट २०१२ रोजी बसने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार राजूरजवळ ठार झाला. १६ एप्रिल २०१२ रोजी ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. राजूर येथील पेट्रोल पंपाजवळ दोन वर्षांपूर्वी एका अपघातात जितेंद्र पुंगळे यांना कायम अपंगत्व आले.
भोकरदन- भोकरदन ते जालना या राज्य मार्गावर २०१३ या वर्षात अपघातात सहा व्यक्ती मृत्यूमुखी तर तीन जखमी, २०१४ या वर्षात ५ व्यक्ती मृत्यूमुखी तर सहा व्यक्ती जखमी झाल्या आहेत. भोकरदन पोलिस ठाण्याच्या हद्दीत केदारखेडा पर्यंतचा म्हणजेच बाणेगाव पाटीपर्यंतचा ११ किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याला दोन वर्षांत अपघातात ११ व्यक्ती मृत्यूमुखी पडले आहेत. त्याच्या पोलिस ठाण्यात नोंदी आहेत. याव्यतिरिक्त कुंभारी पाटीजवळ दोन मोटारसायकलस्वार खड्डे चुकवितांना एकमेकांवर आदळले. दोघेही मृत्यू पावले. लिंगेवाडी पाटीजवळ गाडी उलटल्याने एकाचा मृत्यू झाला. सोयगाव देवी पाटीजवळ एका जणाचा मृत्यू झाला. हसनाबाद येथील खडेकर व कुरेशी या दोन व्यक्तींचा अपघातात पाय मोडला. एकूण या रस्त्यावर अपघातांच्या मालिका कायम आहेत.

Web Title: Order of inquiry by SE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.