चार शाखा अभियंत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश
By Admin | Updated: January 29, 2015 01:14 IST2015-01-29T01:10:59+5:302015-01-29T01:14:39+5:30
उस्मानाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रमाकडे पाठ फिरवणाऱ्या चार अभियंत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार सुभाष काकडे यांनी दिले आहेत.

चार शाखा अभियंत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश
उस्मानाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रमाकडे पाठ फिरवणाऱ्या चार अभियंत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार सुभाष काकडे यांनी दिले आहेत.
जुलै ते डिसेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे आणि नव्याने अस्तिवात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीपैकी उस्मानाबाद तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींचे बुधवारी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १३ जानेवारी रोजी ग्रामपंचायतनिहाय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. असे असतानादेखील काल बुधवारी आरक्षण सोडत कार्यक्रम राबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चार अभियंते गैरहजर होते. त्यामुळे आरक्षण सोडतीच्या कामात व्यत्यय आला. ही बाब जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी गांभिर्याने घेत या प्रकरणी तहसीलदार सुभाष काकडे यांच्यामार्फत संबधितावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली. काकङे यांनी संबंधित दोषी चारही अभियंत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार एस. एस. रामदासी यांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे बुधवारी सकाळी १० वाजता तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले. तेव्हा धूत्ता व गडदेवधरी या गावासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता काळे यांना प्राधिकृत केले होते. वानेवाडी, भंडारवाडी येथील आरक्षण सोडतीसाठी शाखा अभियंता के. डी. कुलकर्णी, वडगाव सि., तावरजखेडा ग्रामंचायतीसाठी अभियंता एस.व्ही. महाजण, तर चिखली व खामसवाडी या ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीसाठी , शाखा अभियंता डी.एम. बनसोडे यांना प्राधिकृत करण्यात आले होते. मात्र, हे चारही शाखा अभियंते बुधवारी प्राधिकृत केलेल्या ग्रामपंचायीत आरक्षण प्रकियेसाठी गैरहजर राहिले.
संबधितांना चारही अभियंत्यांना आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्यासाठी उपस्थित राहण्यासंबंधी तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरुन सांगितले होते. तेव्हा त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला वेगळे काम सांगितले आहे. त्यामुळे आम्ही या निवडणूक आरक्षण सोडत पध्दती राबविण्याच्या कामासाठी येवू शकत ही, असे सांगितले. या चौघाजणांविरुद्ध उस्मानाबाद येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश बजाविण्यात आले. या आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)