फळबाग योजना गावागावात राबवणार
By | Updated: December 4, 2020 04:07 IST2020-12-04T04:07:54+5:302020-12-04T04:07:54+5:30
पाचोड : रोजगार हमी योजना व फलोत्पादन या खात्याच्या माध्यमातून राज्यातील गावागावात रोहयोतून रस्त्याचे कामास प्राधान्य देण्यात येणार आहे. ...

फळबाग योजना गावागावात राबवणार
पाचोड : रोजगार हमी योजना व फलोत्पादन या खात्याच्या माध्यमातून राज्यातील गावागावात रोहयोतून रस्त्याचे कामास प्राधान्य देण्यात येणार आहे. यासह शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न हाती यावे या दृष्टीने गावागावात फळबाग योजना कशी पोहचेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. पाचोडमधील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
पैठण तालुक्यासह राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना अडचणी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करून जागा उपलब्ध करून दिली तर रोहयोमधून रस्ते करता येतील. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात येण्या जाण्याचा चांगला मार्ग झाल्याने याचा त्यांना लाभ होईल. पूर्वी फळबाग लागवड करतांना ठरवून दिलेल्या अंतरावर लागवड करणे बंधनकारक होते. मात्र मी मंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर फळबाग लागवडीतील जाचक अटी रद्द केल्याने याचा शेतकऱ्यांना लाभ झाला. पाचोडसह परिसराला मोसंबीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांची मोसंबी खराब होऊ नये तसेच तिला योग्य भाव मिळावा यासाठी पाचोड व बारामती या दोन ठिकाणी मोसंबी कोल्ड स्टोरेज सेंटरला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पाचोडला लवकरच या सेंटरचे काम सुरू होणार असल्याचे भुमरे म्हणाले. पैठण तालुक्यातील विविध गावात तीर्थक्षेत्र असून त्यांच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास कमिटीच्या माध्यमातून निधी आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जि.प. सदस्य विलास भुमरे, कृउबा समितीचे सभापती राजू भुमरे, अंकुशराव नरवडे, मनोज नरवडे, शिवाजी भुमरे, राम नरवडे, भागवत नरवडे, कृष्णा भुमरे, प्रशासक आसवले, निजाम पटेल, कल्याण भुमरे, विठ्ठल शेळके, अंकुशराव भुमरे, सोसायटीचे अध्यक्ष जिजा भुमरे, माजी सरपंच अंबादास नरवडे, एकनाथ जाधव, नितीन वाघ, प्रल्हाद तारे, बाबासाहेब वालेकर आदी उपस्थित होते.
---- पाचोडमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना मंत्री संदीपान भुमरे.