ऐच्छिक रक्तदान पंधरवड्यास प्रारंभ
By Admin | Updated: October 2, 2014 00:50 IST2014-10-02T00:40:40+5:302014-10-02T00:50:42+5:30
औरंगाबाद : रक्ताला पर्याय देण्यास संशोधनकर्त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे घात, अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने रक्त देऊन त्याचे प्राण वाचविता येते.

ऐच्छिक रक्तदान पंधरवड्यास प्रारंभ
औरंगाबाद : वैद्यकीय क्षेत्राने एवढी प्रगती केली तरी अद्याप मानवी रक्ताला पर्याय देण्यास संशोधनकर्त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे घात, अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने रक्त देऊन त्याचे प्राण वाचविता येते. थॅलेसेमिया, सिकलसेल आजाराच्या रुग्णांना नियमित रक्त दिले तरच ते जिवंत राहू शकतात. याबाबत विविध पातळीवर जागृती होत असतानाही रक्तदान करण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताच्या तुटवड्याचा सामना करावा लागतो. १ आॅक्टोबरपासून सुरू झालेला ऐच्छिक रक्तदान पंधरवडा १५ आॅक्टोबरपर्यंत चालेल. त्यानिमित्ताने शासकीय रक्तपेढीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी रक्तदान जनजागृती रॅली केली होती. ही रॅली सकाळी ९ वाजता शहागंज येथील गांधी पुतळ्यापासून निघून औरंगपुरा येथे विसर्जित झाली. २ ते ६ आॅक्टोबर या कालावधीत रोज विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ८ आॅक्टोबर रोजी घाटीतील बाह्यरुग्ण विभागामध्ये पोस्टर प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अधिष्ठातांच्या हस्ते होईल. शिवाय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ९ रोजी खांडेवाडी येथील बडवे इंजिनिअरिंग कंपनीत रक्तदान शिबीर होईल. १० आॅक्टोबर रोजी विद्यापीठातील समाजकार्य महाविद्यालयात रक्तदान शिबीर, १२ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय घाटीतील रक्तपेढीचे प्रमुख आणि अन्य डॉक्टर मंडळी रक्तदान सर्व श्रेष्ठदान या विषयावर विविध महाविद्यालयांत जाऊन व्याख्यान देणार आहे.