ग्रामीण भागातूनही होतोय विरोध
By Admin | Updated: June 30, 2014 00:40 IST2014-06-30T00:08:24+5:302014-06-30T00:40:50+5:30
वसमत : नगर परिषदेने कत्तलखाना उघडण्यासाठी निविदा मागवल्याने तालुकाभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

ग्रामीण भागातूनही होतोय विरोध
वसमत : नगर परिषदेने कत्तलखाना उघडण्यासाठी निविदा मागवल्याने तालुकाभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील सरपंच व शेतकऱ्यांनीही या विरोधात अॅड. संदीप भालेराव मित्र -मंडळाच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. त्यामुळे कत्तलखाना प्रकरण आता चांगलेच तापल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
वसमत नगरपालिकेने सर्वे नं. ३९ मध्ये बीओटी तत्वावर कत्तलखाना उभारणीसाठी निविदा काढल्या आहेत. निविदा नगरपालिकेला प्राप्तही झाल्या आहेत. या निविदा मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष कत्तलखाना निर्मितीचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र नगर पालिकेच्या या कत्तलखान्यास प्रचंड विरोध होत आहे. आजवर २० संघटनांनी या कत्तलखान्याविरोधात निवेदने दिली आहेत.
वसमत शहरातील नागरिक व कार्यकर्ते नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या निविदा काढल्याच कशा? असा प्रश्न करत आहेत.
शहरातील विरोध आता ग्रामीण भागातही होत आहे. अॅड. संदीप भालेराव मित्रमंडळाने यासाठी तालुक्यातील सरपंच व शेतकऱ्यांना एकत्रित करणे सुरू केले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या निवेदनात नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत कत्तलखाना रद्द करण्याचा ठराव पास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कत्तलखान्यामुळे गोवंश नष्ट होईल, तालुक्यातील पशुधन संकटात येईल, शेतकरी संकटात येतील, अशी भीती व्यक्त करून कत्तलखाना रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर संतोष भालेराव, रांजोना येथील सरपंच रामचंद्र साळवे, एकरूखा गावचे सरपंच गोविंदराव कदम, रेवूलगावचे सरपंच विश्वनाथराव फेगडे, विरेगावच्या सरपंच पंचफुलाबाई डुकरे, बळेगावच्या सरपंच धारुबाई नवले. तेलगावचे माजी सरपंच ईश्वर कानोडे, गजानन कदम, तुकाराम अंभोरे, नवनाथ पंठरकर, राम कातोरे, मुंजाजी साखरे, उमेश खाकरे, नारायण इंगोले, नरहरी फेगडे, दत्तराव नवले, नवनाथ पंठरकर, नितीन हंडे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी व सरपंच कत्तलखान्याच्या विरोधात उतरल्याने हा लढा उग्र होत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)