राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय!

By Admin | Updated: March 14, 2016 00:38 IST2016-03-14T00:29:46+5:302016-03-14T00:38:05+5:30

उस्मानाबाद : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सर्वपक्षीयांनी एकत्रित येण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेतला.

Opposition against the nationalist! | राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय!

राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय!



उस्मानाबाद : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सर्वपक्षीयांनी एकत्रित येण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेतला. दरम्यान, या बैठकीवरून शिवसेनेतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. बैठकीला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. सदर बैठकीशी पक्षाचा कसलाही संबंध नसल्याचे सांगत शिवसेना स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
उस्मानाबाद बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी रविवारी सर्वपक्षीयांनी एकत्रित येवून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला शिवसेनेचे माजी आ. ओम राजेनिंबाळकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सूरज साळुंके, संजय निंबाळकर, भाजपा तालुकाध्यक्ष जीवन देशमुख यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख दिलीप जावळे, सुरेश पाटील, नारायण समुद्रे, अ‍ॅड. व्यंकट गुंड, लक्ष्मण सरडे, संजय देसाई, सतीश सोमाणी, दगडू धावारे, प्रदीप सस्ते, मधुकर तावडे, मुन्ना खटावकर, बाबूराव नाईकवाडी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत राष्ट्रवादी विरोधात सर्व ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची समन्वय समितीही स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेना जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी या बैठकीशी शिवसेनेचा कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. काँग्रेस अथवा राष्ट्रवादी यांच्याबरोबर शिवसेनेची कदापिही युती होणार नाही. वरिष्ठांनी आदेश दिल्यास भाजपा तसेच मित्रपक्षासोबत युती करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. पक्षाचा आदेश डावलून जे पदाधिकारी काँग्रेस अथवा राष्ट्रवादीबरोबर युतीसाठीची बोलणी करतील, अशा पदाधिकाऱ्यांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रमुख पाटील यांनी दिला आहे.
उस्मानाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसंदर्भात सर्वपक्षीय बैठक झाल्याचे समजले. या बैठकीला भाजपाचे तालुकाध्यक्ष जीवनराव देशमुख उपस्थित होते. मात्र, ही बैठक कोणी बोलावली होती. याबाबतची कसलीही अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. दरम्यान, या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेण्यात येत असून, या बैठकीनंतरच भाजपा आपली भूमिका जाहीर करेल, असे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसंदर्भात उस्मानाबादेत रविवारी बैठक झाली. मात्र, सदर बैठक तालुका अध्यक्षस्तरावरची होती. त्यामुळे या बैठकीबाबतची कल्पना नाही. बाजार समिती निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाचे धोरण ठरविण्यासाठी लवकरच पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर पक्षाचा अधिकृत निर्णय जाहीर करण्यात येईल, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी सांगितले.
बाजार समिती निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात येणार असून, या बैठकीला जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही सुधीर पाटील यांनी केले आहे.

Web Title: Opposition against the nationalist!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.