पहिल्यांदाच मिळाली हवाई सफरीची संधी
By Admin | Updated: July 8, 2014 01:00 IST2014-07-07T23:28:50+5:302014-07-08T01:00:04+5:30
उस्मानाबाद : वडील जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहायक या पदावर कार्यरत असले तरी आपण अवघ्या बाराव्या वर्षी हवाई सफर करू, असे कधीच वाटले नव्हते.

पहिल्यांदाच मिळाली हवाई सफरीची संधी
उस्मानाबाद : वडील जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहायक या पदावर कार्यरत असले तरी आपण अवघ्या बाराव्या वर्षी हवाई सफर करू, असे कधीच वाटले नव्हते. परंतु, अपेक्षाही न ठेवलेले हवाई सफरीचे हे स्वप्न ‘लोकमत’मुळे पूर्ण होत आहे. वडिलांकडे हट्ट धरून ‘लोकमत’ पेपर सुरू केला. त्यामुळे पहिल्यांदाच संस्काराचे मोती स्पर्धेत सहभाग नोंदविला अन् हवाई सफरीची संधी मिळाली. हा आनंद गगनात न मावणारा असल्याची प्रतिक्रिया सुमित आवटे या विद्यार्थ्याने व्यक्त केली.
‘लोकमत’च्या वतीने आयोजित संस्काराचे मोती निसर्ग सफारी स्पर्धेमध्ये शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलचा सहावीच्या वर्गातील विद्यार्थी सुमित जालिंदर आवटे याची जिल्ह्यातून ‘मुंबई-दिल्ली-मुंबई’ या हवाई सफरीसाठी निवड झाली आहे. ही गोड बातमी समजताच मला एवढा आनंद झाला की, तो गगनात न मावणारा असल्याचे तो म्हणाला. वडील नोकरीला असल्याने आर्थिक स्थिती फार चांगली वा फार बिकटही नाही. त्यामुळे घरी नियमित वृत्तपत्र येत होते. मी पहिली दुसरीच्या वर्गात असताना केवळ फोटो पहायचो. मात्र, चौथीच्या वर्गात आल्यानंतर पेपर चाळू लागलो. हळूहळू वाचनाची आवड वाढत गेली. प्राणी, क्रिकेट, लहान मुलांसदर्भातील बातम्या मी आवर्जून वाचतो. मागील अनेक वर्षांपासून आमच्या घरामध्ये ‘अन्य’ एक पेपर होता. परंतु, एके दिवशी मित्राकडे गेलो असताना ‘लोकमत’ पेपर वाचण्यात आला. ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेचे संपूर्ण पान वाचले आणि घरी येऊन वडिलांकडे ‘लोकमत’ सुरू करण्याचा हट्ट धरला. मला ‘संस्काराचे मोती’ या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, असे सांगितले. त्यावर वडिलांनीही दुसऱ्याच दिवशी ‘लोकमत’ सुरू केला. त्यानंतर मी दररोज सकाळी लवकर उठून पेपर कधी येतो, याची वाट बघायचो. पेपर आल्याबरोबर सर्वप्रथम ‘संस्काराचे मोती’ हे पान उघडून ते वाचायचो. लागलीच कात्रण काढून ते वहीमध्ये चिटकायचो. या कामी मला माझी आई मनीषा आवटे हिचीही मदत व्हायची. स्पर्धेचा कालावधी संपल्यानंतर भाऊ आतिश आवटे आणि मी स्वत: कात्रणाची फाईल, कलाकुसर करून तयार केली. ती शाळेत जाऊन जमा केली. त्याचवेळी मनामध्ये ‘मला कुठले तरी बक्षीस लागेल’ असे आले होते. मात्र, या माध्यमातून हवाई सफरीचे स्वप्न साकार झाले. (प्रतिनिधी)
पारितोषिके देऊन विजेत्यांचा गौरव
‘लोकमत’च्या वतीने आयोजित संस्काराचे मोती निसर्ग सफारी २०१३ या स्पर्धेमध्ये शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलचा सहावीच्या वर्गातील विद्यार्थी सुमित जालिंदर आवटे याची जिल्ह्यातून ‘मुंबई-दिल्ली-मुंबई’ या हवाई सफरीसाठी निवड झाली आहे. यानिमित्त ‘लोकमत’च्या वतीने भोसले हायस्कूलमध्ये त्याचा पालकासह सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात स्पोर्ट्सबुक २०१४ या स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यात अपेक्षा गव्हाणे हिने प्रथम क्रमांकाचे पियानो हे पारितोषिक पटकाविले. तसेच शैलेश पावरा याला द्वितीय क्रमांकाची ट्रॉली बॅग तर अभय काटे यास तृतीय क्रमांकाचे बॅडमिंटन सेट हे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास ‘लोकमत’चे उपसरव्यवस्थापक (रेस) संजय सैंदाणे, सोलापूरचे वितरण व्यवस्थापक दीपक कदम, उस्मानाबादचे शाखा व्यवस्थापक मकरंद शहापूरकर, जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एस. एस. पडवळ, पर्यवेक्षक एस. बी. कोळी, के. डी. हजारे, के. वाय. गायकवाड आदींनी सहकार्य केले.