माध्यम क्षेत्रात तरुणांना संधी
By Admin | Updated: September 3, 2014 00:30 IST2014-09-03T00:28:32+5:302014-09-03T00:30:07+5:30
माहितीच्या युगात माध्यमांचे महत्त्व आणखी वाढले आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या पुरक संधी उपलब्ध असल्याचे मत माजी कुलगुरु डॉ़ सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले़

माध्यम क्षेत्रात तरुणांना संधी
नांदेड: तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जगण्याचे आयाम पुरते बदलले आहेत़ माहितीच्या युगात माध्यमांचे महत्त्व आणखी वाढले आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या पुरक संधी उपलब्ध असल्याचे मत माजी कुलगुरु डॉ़ सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले़
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात ‘माध्यम क्षेत्रातील विविध संधी’ या विषयावर मंगळवारी व्याख्यान झाले़ डॉ़ गव्हाणे म्हणाले, आजचे युग नाविण्यपूर्ण कल्पनांचे आहे़ नवमाध्यमांमुळे भविष्यात मनोरंजन व माध्यम क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत़ त्याचा वेध घेवून युवकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे़ युवक आणि माध्यमांचा अतुट संबंध आहे़ भारत ही मोठी बाजारपेठ असल्याने जगभरातील विविध कंपन्या येथे गुंतवणूक करत आहेत़ मनोरंजन व माध्यम इंडस्ट्रीज ही स्वतंत्र आर्थिक क्षेत्र बनले आहे़ जिथे गुंतवणूक जास्त असते तेथे संधीही आपोआपच वाढतात़ या क्षेत्रातील स्पर्धा लक्षात घेता माध्यम क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देणारा भारत जगातील प्रथम क्रमांकाचा देश बनेल़ माध्यमांचे लोकशाहीकरण होत आहे़ सिटीझन जर्नालिझमचे महत्त्व हे याचेच द्योतक होय़ तंत्रज्ञान दिवसेंदिवस अधिक प्रगत होत असून त्यावर कोणाचेही नियंत्रण ठेवणे शक्य नाही़
देशातील ८३ टक्के विद्यार्थी उच्च- शिक्षित आहेत़ तरीही त्यांना म्हणावा त्या प्रमाणात रोजगार मिळत नाही़ चाकोरीबद्ध शिक्षणातून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी व्यवसायपूरक शिक्षण आत्मसात करणे गरजेचे आहे़ असे झाले तरच योग्य दिशा मिळून रोजगार उपलब्ध होईल़ परिणामी देशाची आर्थिक स्थिती आपोआपच सुधारेल़ निसर्गाने आपल्या अकाऊंटवर खूपकाही टाकले आहे़ मात्र त्याचा वापर कशाप्रकारे करायचा यावर सर्व अवलंबून आहे़
अध्यक्षस्थानी संचालक डॉ़ दीपक शिंदे होते़ प्राचार्या डॉ़ रेखा शेळके, अनिकेत कुलकर्णी, चारुलता रोजेकर, नरेश दंडवते, प्रा़ डॉ़ राजेंद्र गोणारकर, प्रा़ सचिन नरंगले, डॉ़ कैलाश यादव, डॉ़ संपत पिंपळे, प्रा़ संदीप नरडेले यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन गजानन अंबोरे यांनी केले़(प्रतिनिधी)