तुळजामातेच्या धार्मिक विधींवरील करवाढीस पुजाऱ्यांचा विरोध
By Admin | Updated: July 7, 2017 16:58 IST2017-07-07T16:58:30+5:302017-07-07T16:58:30+5:30
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी मांडलेल्या तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधींवर कर वाढविण्याच्या प्रस्तावास पुजारी मंडळांकडून जोरदार विरोध होत आहे़.

तुळजामातेच्या धार्मिक विधींवरील करवाढीस पुजाऱ्यांचा विरोध
ऑनलाइन लोकमत
तुळजापूर : मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी मांडलेल्या तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधींवर कर वाढविण्याच्या प्रस्तावास पुजारी मंडळांकडून जोरदार विरोध होत आहे़.
मंदिर संस्थानच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी अभिषेक कर १० रुपयांवरुन १०० रुपये करणे व पेड दर्शन सुरु करण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडला. या प्रस्तावास आमदार मधुकरराव चव्हाण यांनी पहिल्यांदा विरोध करुन सर्वांनाच विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका मांडली़. यानंतर पुजारी, भोपे, उपाध्ये मंडळांनीही अशीच भूमिका जाहीर केली आहे़.
करवाढ अन्यायकारक असल्याचे सांगत पेड दर्शनद्वारे चुकीचा पायंडा पडेल, अशी भूमिका पुजारी मंडळाने मांडली. भवानीमातेच्या दर्शनासाठी येणारा जवळपास ८० टक्के भाविक गरीब असतो़, अशी करवाढ लादली गेली तर ती पर्यायाने भाविकांवरच लादली जाऊ शकते़ या बाबीचा विचार होणे गरजेचे आहे़. मंदिराचे उत्पन्न चांगले असताना अशा वाढीची गरजच काय ? शिवाय, उत्पन्नातून भाविकांना पुरेश्या सुविधा मिळत नाहीत़ पाणी, स्वच्छतागृहाची येथे मोठी गरज आहे़ त्याकडे संस्थानने लक्ष द्यावे, अशी भूमिका जिल्हाधिकारी गमे यांच्या समोर मांडण्यात येणार असल्याची माहिती पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी दिली.