‘ओपिनियन मेकर’ उमेदवारांची वानवा!
By Admin | Updated: November 4, 2016 00:25 IST2016-11-04T00:24:00+5:302016-11-04T00:25:31+5:30
जालना अभ्यासू आणि शहराच्या विकासाची जाण असलेल्या उमेदवारांची सद्यस्थितीत सर्वच पक्षांत वानवा असल्याचे चित्र त्या त्या पक्षांच्या उमेदवारांच्या यादीवरुन दिसून येते.

‘ओपिनियन मेकर’ उमेदवारांची वानवा!
राजेश भिसे जालना
नगर परिषद हा गत काही वर्षांपासून आखाडा बनला असून, अभ्यासू आणि शहराच्या विकासाची जाण असलेल्या उमेदवारांची सद्यस्थितीत सर्वच पक्षांत वानवा असल्याचे चित्र त्या त्या पक्षांच्या उमेदवारांच्या यादीवरुन दिसून येते. एकूणच ‘मसल आणि मनी पॉवर’ असलेला उमेदवार निवड प्रक्रियेत अधिक प्रभावी ठरल्याचे दिसून येत आहे.
जालना नगर परिषद अ दर्जाची पालिका. मात्र, गत काही वर्षांत जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या या नगर परिषदेत अभ्यासू नेतृत्व आणि नगरसेवकांची संख्या कमी होत गेली. मुद्दयाची भाषा गुद्दयावर गेल्याचे पालिकेच्या अनेक सभांवरुन स्पष्ट होते. अशा प्रकारांमुळे अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्व असलेल्या व्यक्तींनी पालिकेत नगरसेवकाच्या रुपाने जाणे टाळले. त्यामुळे नगर परिषद हा आखाडाच बनल्याचे चित्र गत काही दिवसांत दिसून आले आहे. अर्थकारणातून सत्ताकारण आणि सत्ताकारणातून अर्थकारण हेच सूत्र गत काही वर्षांत राजकारणात रुढ झाले आहे. त्यामुळे कोणतीही निवडणूक लढविणे हे आर्थिकदृष्ट्या सोपे राहिलेले नाही. परिणामी डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील यासारख्या सामाजिक प्रतिष्ठा लाभलेल्या व्यक्तींनी निवडणूक न लढविणेच पसंत केले आहे. जनाधार नसलेले पण ‘मनी आणि मसल पॉवर’ असलेल्या व्यक्तींचा पालिकेत शिरकाव झाला. खिलाडूवृत्तीने कोणत्याही विषयावर सर्वंकष चर्चा झाल्याचे पालिका सभांत अनेक दिवसांपासून दिसून आले नाही. वैचारिक मतभेद असावेत मात्र विकास आणि जनहिताच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले तर शहराचा सर्वांगीन होण्यास मदतच होते. पण अशी स्थिती अपवादात्मक परिस्थिती वगळता जालनेकरांना कधी अनुभवास आली नाही. किती नगरसेवकांना पालिका प्रशासनाचे नियम माहित आहेत. पाच वर्षांत किती नगरसेवकांनी चर्चेत सहभाग नोंदवला वा विकासाच्या मुद्द्यावर आपले परखड मत व्यक्त केले. हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. एकूणच नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडे अभ्यासू उमेदवारांची वानवा असल्याचे चित्र आहे. विविध विषयांचा अभ्यास असलेले उमेदवार सध्या तरी रिंगणात नसल्याने आगामी काळात पालिकेचा ‘आखाडा’ कोणत्या मुद्द्यांवर गाजणार हे काळच ठरवेल.