लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : श्रावण महिन्यास सोमवारपासून प्रारंभ होत असल्याने लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी संस्थान सज्ज झाले असून, जय्यत तयारी करण्यात येत आहे. श्रावणातील दर शनिवारी जिल्हा तसेच परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यात औरंगाबाद शहरातून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. भाविकांना पावसापासून त्रास होऊन नये म्हणून संस्थानने पत्र्याचे भव्य शेड उभारले असून, चिखलापासून त्रास होऊ नये म्हणून रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचबरोबर स्पेशल दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर शुक्रवारी रात्री येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मंदिराजवळ पोलीस चौकी उभारण्यात येईल. तसेच मोबाईल व पाकीटमारांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती पोनि. हरीश खेडकर यांनी दिली. शुक्रवार ते सोमवारपर्यंत शरणापूर टी-पॉइंट ते वेरूळपर्यंतचा मार्ग जड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर रहाटपाळणे तसेच मनोरंजनाची इतर साधने आली आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात दुकाने थाटण्यात आली आहेत. भद्रा मारुती संस्थानचे पदाधिकारी भाविकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत.वेरूळ : श्रावण महिन्याच्या तयारीसाठी श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाने जोरदार कंबर कसली आहे. शुक्रवारी मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली असून, पुन्हा अतिक्रमण केल्यास सरळ पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा तहसीलदार अरुण जऱ्हाड यांनी दिला.येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्ट आणि तहसील प्रशासनाच्या वतीने गुरुवारी आढावा बैठक मंदिर परिसरात घेण्यात आली. या बैठकीत मंदिर परिसरातील व्यावसायिकांचे वाढलेले अतिक्रमण, भाविकांच्या परिवहन सुविधा, विजेची उपलब्धता, अग्निशामक दलाची पूर्तता, पिण्याचे पाणी, पार्किंग, निर्माल्य आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच तहसीलदार अरुण जऱ्हाड यांनी मंदिर परिसरातील वाढलेले अतिक्रमण काढून टाकण्यासाठी मंदिर परिसरातील दुकानदारांना विश्वासात घेऊन अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना दिल्या आणि दुकानदारांनीही तहसीलदारांच्या आदेशाचे पालन करीत वाढवलेले अतिक्रमण काढून टाकले. शिवाय शिवलिंगावर बेलाची पाने व फुले वळगता काटेरी धोत्र्याची फुले, केळीचे कमळ, चंदनाचा पाला, बंद पाकिटातील दूध वाहण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही तहसीलदारांनी सांगितले. यावेळी तहसीलदार अरुण जऱ्हाड, पोलीस निरीक्षक हरीश खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक ए.जी. पाटील, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, देवस्थानचे अध्यक्ष दीपक शुक्ल, विश्वस्थ चंद्रशेखर शेवाळे, दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष गणेश हजारी, सदस्य बैग्या चव्हाण, सरपंच साहेबसिंग गुमलाडू, पुरातत्व विभागाचे संवर्धक सहायक आर.यू. वाकळेकर, महेंद्र दगडफोडे, ग्रामविकास अधिकारी आसाराम बनसोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे, महावितरणचे सहायक अभियंता एस.आर. जाधव, तलाठी एन.बी. कुसनुरे, पोलीस पाटील रमेश ढिवरे, जगन्नाथ काळे, बी.डी. वाहूळ, नारायण मेहेर, अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिकांची उपस्थिती होती.
श्रावणासाठी खुलताबाद, वेरूळ सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:58 IST