औरंगाबाद : मागील तीन दिवसांपासून शहरातील वीजपुरवठा रोज खंडित होत आहे. मंगळवारी शहरात पावसाच्या हलक्या सरींनीही अनेक भागांतील वीज गुल झाल्यामुळे महावितरणचे पितळ उघडे पडले. छावणी उपविभागांतर्गत नंदनवन कॉलनी, भीमनगर, भावसिंगपुरा परिसरातील वीजपुरवठा दिवसभरातून तीन ते चार वेळा खंडित झाल्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
गेल्या तीन दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. मंगळवारी दुपारीच निम्म्या शहरातील तब्बल दोन-तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे लगेच गारखेडा, पन्नालालनगर, सूतगिरणी चौक, शिवाजीनगर, सातारा, देवळाई, सिडको एन-८, सिडको एन-३, सिडको एन-४, कांचनवाडी, हिंदुस्तान आवास परिसर, छावणी, नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, भीमनगर, भावसिंगपुरा आदी भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. सातारा-देवळाई आणि सिडको-हडकोतील वसाहतींमध्ये तब्बल तीन तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले. मागील तीन दिवसांपासून छावणी उपविभागाला होणारी ३३ केव्ही लाईनमध्ये बिघाड झाल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात येते.
मंगळवारीही दुपारनंतर तब्बल चार- पाच तास वीज गायब झाली. सायंकाळी वीज आली आणि पुन्हा नंदनवन कॉनली, संगीता कॉलनी, भीमनगर, भावसिंगपुरा भागाची वीज गेली. यासंदर्भात नागरिकांनी छावणी उपविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद करून ठेवले. त्यामुळे भीमनगर येथील रहिवाशांनी छावणी उपविभागात जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपविभागात एकच कर्मचारी बसलेला होता. त्या कर्मचाऱ्यासमक्षही नागरिकांनी अधिकाऱ्यांनी संपर्क साधला; पण तेव्हाही त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. त्या कर्मचाऱ्याने लाईनमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकाही लाईनमनने त्यांचा फोन घेतला नाही.
मान्सूनपूर्व दुरुस्तीपावसाळ्यामध्ये वीज यंत्रणेत बिघाड होऊ नये यासाठी महावितरणच्या वतीने दरवर्षी मान्सूनपूर्व दुरुस्ती करण्यात येते. त्यामध्ये वीजवाहिन्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापणे, ट्रान्सफॉर्मरची देखभाल आणि दुरुस्ती, खाली आलेल्या वीजवाहिन्यांना कंडक्टर लावणे अथवा कंडक्टर बदलणे, फिडर आणि पिलरची देखभाल तसेच दुरुस्ती आदी कामे करण्यात येतात. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात या कामांचा शुभारंभ करण्यात येतो. यंदाही मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली असून, या कामाच्या नावाखाली चार-पाच तास वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.