समांतर कंपनीचे कार्यालय उघडले
By Admin | Updated: June 20, 2016 00:59 IST2016-06-19T23:37:04+5:302016-06-20T00:59:43+5:30
औरंगाबाद : शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे काम पाहणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने मागील आठ दिवसांपासून आपले कार्यालय बंद ठेवून मनपासह नागरिकांना वेठीस धरले होते.

समांतर कंपनीचे कार्यालय उघडले
औरंगाबाद : शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याचे काम पाहणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने मागील आठ दिवसांपासून आपले कार्यालय बंद ठेवून मनपासह नागरिकांना वेठीस धरले होते. कंपनीच्या या भूमिकेविरुद्ध मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी यशस्वी शिष्टाई केली. रविवारी सकाळी कंपनीने आपले सिडको एन-१ येथील कार्यालय उघडले. कंपनीला दरमहिना देण्यात येणारी रक्कमही मनपाने थांबवून ठेवली होती. शनिवारी सायंकाळीच कंपनीला तब्बल ४ कोटी रुपये अदा करण्यात आले.
समांतर जलवाहिनीचे काम पाहणाऱ्या कंपनीचे भवितव्य येणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठरणार आहे. कंपनीला अभय मिळेल का, हकालपट्टी होईल यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
आठ ते दहा दिवसांपूर्वी कंपनीच्या लाईनमनला सिडको एन-७ भागात मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात जोरदार राडा केला होता.
त्याचप्रमाणे कंपनीच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आले होते. तेव्हापासून कंपनीने कार्यालय बंदच ठेवले होते. सर्वसामान्य नागरिक, नगरसेवक कंपनीच्या या भूमिकेमुळे त्रस्त झाले होते.
शनिवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी कंपनीचे कार्यालय बंद असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आजच चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. शनिवारी सायंकाळी मनपाने कंपनीला ४ कोटी रुपये अदा केले. त्यानंतर आयुक्तांच्या सूचनेनुसार रविवारी कार्यालयही उघडण्यात आले.