उघड चौकशीचा अहवाल गुलदस्त्यातच
By Admin | Updated: June 23, 2016 01:06 IST2016-06-23T00:19:06+5:302016-06-23T01:06:01+5:30
गंगाराम आढाव , जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार, अपसंपदा आदीबाबत आलेल्या तक्रारीवरून तसेच काही अपसंपदाच्या संशयावरून अशा एकूण

उघड चौकशीचा अहवाल गुलदस्त्यातच
गंगाराम आढाव , जालना
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार, अपसंपदा आदीबाबत आलेल्या तक्रारीवरून तसेच काही अपसंपदाच्या संशयावरून अशा एकूण २०१३ ते २०१५ या काळात पाच अधिकाऱ्यांची उघड चौकशी करण्यात आली. मात्र या उघड चौकशीचा अहवाल अतिशय गुप्त ठेवण्यात आला आहे. त्यावरील कार्यवाहीचा प्रस्ताव लालफित बंद असून, अद्याप एकाही प्रकरणावर निर्णय झालेला नसल्याने उघड चौकशी केवळ फार्स ठरत असल्याची चर्चा होत आहे.
जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने गेल्याने तीन वर्षात पाच अधिकाऱ्यांची शासनाकडून प्राप्त झालेल्या उघड चौकशी आदेशान्वये उघड चौकशी केलेली आहेत. त्यात भोकरदनचे तत्कालिन कृषी अधिकारी बोदरवाड यांची २६ नोव्हेंबर २०१३ पासून उघड चौकशी सुरू करण्यात आली. २२ मे २०१५ रोजी मुख्यालयाच्या पत्रानुसार त्रुटीपूर्ततेसाठी बोदरवाड यांचे प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले. तत्कालिन वन परिक्षेत्र अधिकारी जालना मोहन कासार यांची १८ जून २०१४ पासून उघड चौकशी सुरू करण्यात आली होती. घनसावंगी पंचायत समितीच्या तत्कालिन गटविकास अधिकारी वर्षा पवार यांची १ सप्टेंबर २०१४ पासून, घनसावंगीचे तत्कालिन तहसीलदार अभय चव्हाण यांची ११ नोव्हेंबर २०१४ पासून तसेच महावितरणचे तत्कालिन अधीक्षक अभियंता ए. जे. नवघरे यांची १४ मे २०१५ पासून चौकशी सुरू करण्यात आली होती.
कृषि अधिकारी बोदरवाड व घनसावंगीचे तहसीलदार चव्हाण यांची चौकशी त्रुटी पुर्ततेवर तर उर्वरीत तिघांची चौकशी अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान गेल्या तीन वर्षांत या पाच अधिकाऱ्यांची उघड चौकशी झाली. मात्र चौकशीत काय निष्पन्न झाले हेच अद्याप उघड झाले नाही.