सेनेतील गटबाजी उघड
By Admin | Updated: July 3, 2014 00:57 IST2014-07-03T00:54:35+5:302014-07-03T00:57:38+5:30
औरंगाबाद : खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागेवर स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन व मजनू हिल येथील डॉ. सलीम अली सरोवराच्या सौंदर्यीकरणाचे उद्घाटन आज दुपारी झाले.

सेनेतील गटबाजी उघड
औरंगाबाद : महापालिकेने सिडको एन-१०, टीव्ही सेंटर येथील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागेवर स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन व मजनू हिल येथील डॉ. सलीम अली सरोवराच्या सौंदर्यीकरणाचे उद्घाटन आज दुपारी झाले. याप्रसंगी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी दिसून आली. आ. संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची कार्यक्रमाला गैरहजेरी उपस्थितांच्या नजरेतून सुटली नाही. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक खा. चंद्रकांत खैरे यांनी स्वत:च आ. शिरसाट हे मुंबईला कामानिमित्त गेल्याचे सांगून उपस्थितांच्या मनातील शंकेचे निरसन केले. आ. शिरसाट यांचे भूमिपूजन कार्यक्रम पत्रिकेत नाव नव्हते. त्यावरून त्यांचे समर्थक सभापती विजय वाघचौरे आणि महापौर कला ओझा यांच्यात जोरदार वाद झाला होता. नवीन पत्रिका छापल्यानंतर तो वाद मिटला. मात्र, आ. शिरसाट हे कार्यक्रमाला आले नाहीत.
दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या बैठकीनंतर आ. प्रदीप जैस्वाल समर्थक भाविसेचे मराठवाडा निमंत्रक राजेंद्र जंजाळ आणि आ. शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्या वादामुळे दोन्ही आमदारांमध्ये शाब्दिक चकमकही झाली होती. त्यामुळेही आ. शिरसाट कार्यक्रमाला आले नसल्याची चर्चा सुरू होती.
भूमिपूजनप्रसंगी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे प्रास्ताविक करताना म्हणाले की, बीओटीऐवजी भाडेकरारानुसार हा प्रकल्प हाती घेतला आहे. १२ कोटींच्या प्रकल्पातून मनपाला ८ कोटी रुपये उत्पन्न मिळेल. ४५ लाख रुपयांना पहिले दुकान विक्री झाल्याचे ते म्हणाले.
खा. खैरे म्हणाले की, शहरातील मनपाच्या मालकीचे भूखंड अतिक्रमित होत आहेत. मनपाकडे अनेक भूखंडांचे पीआर कार्ड नाही. पालिकेच्या जागेवर व्यापारी संकुल झाले पाहिजेत. याप्रसंगी महापौर कला ओझा यांनीही भाषण केले. व्यासपीठावर शहर अभियंता एस.डी. पानझडे, गजानन बारवाल, सभागृहनेते किशोर नागरे, सभापती विजय वाघचौरे, नगरसेवक सुरेश इंगळे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, अमित भुईगळ, बाळासाहेब थोरात, अनिल मकरिये, मीर हिदायत अली, मोहन मेघावाले, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, अफसर सिद्दीकी, सिकंदर अली यांची उपस्थिती होती.
बीओटीच्या उपक्रमावर टीका
आ. प्रदीप जैस्वाल यांनी बीओटीऐवजी लीज पद्धतीने मनपाच्या जागांचा विकास करण्याची मागणी केली. वसंत भवन, सिद्धार्थ उद्यान, औरंगपुरा येथील बीओटीचे प्रकल्प रेंगाळल्याचे ते म्हणाले. वसंत भवन, औरंगपुरा येथील बीओटीवरील प्रकल्पांचे काम खा. खैरे यांचे निकटवर्तीय गुत्तेदारी एम. बी. पाटील यांच्याकडे आहे. उपमहापौर संजय जोशी यांनीही बीओटीच्या प्रकल्पांवर ताशेरे ओढले. ते प्रकल्प कधी येतात. कुठे जातात. त्यातून मनपाला काय मिळते, हे काहीही कळत नसल्याचे ते म्हणाले. आ.जैस्वाल, उपमहापौर जोशी यांची टीका खा.खैरे यांना झोंबली. त्यांनी मनपाचे बीओटी कक्षप्रमुख सिकंदर अली यांना जाब विचारला. सिद्धार्थ उद्यानाच्या प्रकल्पाचे काय झाले, उर्वरित प्रकल्पांची कामे मंदगतीने सुरू आहेत. त्या कामांना गती देण्याची सूचना त्यांनी केली.
पुण्याच्या संस्थेकडे सौंदर्यीकरण
शासनाच्या मराठवाडा विकास कार्यक्रम-२००७ अंतर्गत सरोवर सौंदर्यीकरणासाठी साडेपाच कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. शासनाने २ कोटी दिले आहेत. आजवर ४ कोटी ८४ लाखांचा खर्च झाला आहे.
पुण्याच्या ग्रीन लँड या संस्थेने सौंदर्यीकरणाचे काम केले. यामध्ये सरोवरातील पाण्याची खोली वाढविण्यासाठी डिस्टलिंग करणे, पक्षी निरीक्षणासाठी २५ फूट टॉवर बांधणे, सेंट्रल पाथवेचे सौंदर्यीकरण करणे, मुख्य रस्त्यालगत लोखंडी ग्रील बसविणे, पार्किंगची व्यवस्था करणे, सरोवरात बोटिंगच्या व्यवस्थेसाठी जेटीवर्कचे काम करणे, मुख्य प्रवेशद्वार उभारणे.