विमानतळ खुले
By Admin | Updated: July 3, 2016 00:51 IST2016-07-03T00:35:24+5:302016-07-03T00:51:40+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ २४ तास खुले ठेवण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी मागितली आहे.

विमानतळ खुले
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ २४ तास खुले ठेवण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी मागितली आहे. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयानेही सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच विमानतळ २४ तास खुले राहील. यातून विमानसेवा वाढण्यासाठीही हातभार लागेल.
चिकलठाणा विमानतळ आजघडीला दोन शिफ्टमध्ये सुरू राहते. विमानतळ सकाळी ६.१५ वाजेच्या विमानसेवेसाठी खुले होते आणि रात्री ८.४० वाजेच्या विमानाच्या उड्डाणानंतर बंद होते. रात्रीच्या वेळी विमानतळ सुरू राहिल्यास त्याचा विमानसेवा वाढण्यासाठी फायदा होईल. त्यामुळे प्राधिकरणाने यादृष्टीने पाऊल टाकले आहे. चिकलठाणा विमानतळ २४ तास खुले ठेवण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी मागण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावर अनेकदा खराब हवामान, विमानांची गर्दी आणि अन्य कारणांमुळे लँडिंगसाठी विमानांना अनेकदा प्रतीक्षा करावी लागते.
अशा वेळी विमानांना आकाशात घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नसतो. विमानात पुरेसे इंधन असेपर्यंत घिरट्या घातल्या जातात; परंतु अपुऱ्या इंधनामुळे विमान अन्य विमानतळाकडे पाठविले जाते. अशा विमानांसाठी औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळ हे अधिक जवळ पडते. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अशा प्रकारे चिकलठाणा विमानतळावर विमानांचे लँडिंग झाले. मुंबई विमानतळावर लँडिंगसाठी अडचण येणाऱ्या विमानांना चिकलठाणा विमानतळाचा पर्याय समोर आला आहे. चिकलठाणा विमानतळ २४ तास खुले ठेवण्यासाठी मंजुरी मागताना हीच बाब प्राधिकरणाने आवर्जून नमूद केली आहे. रात्रीच्या वेळी ६ विमाने उभी राहू शकतात, असे विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय म्हणाले.