भंडारवाडीच्या पाण्याची नुसतीच आस
By Admin | Updated: December 16, 2014 01:06 IST2014-12-16T00:45:48+5:302014-12-16T01:06:05+5:30
आशपाक पठाण, लातूर गेल्या दोन वर्षांपासून लातूरकरांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे़ मांजरा प्रकल्पात पाणी अत्यल्प असल्याने मनपा प्रशासनाने नवा पर्याय समोर आणला़

भंडारवाडीच्या पाण्याची नुसतीच आस
आशपाक पठाण, लातूर
गेल्या दोन वर्षांपासून लातूरकरांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे़ मांजरा प्रकल्पात पाणी अत्यल्प असल्याने मनपा प्रशासनाने नवा पर्याय समोर आणला़ रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी येथील प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकून, नवे पंप बसविण्यासाठी मनपाने तीन महिन्यांत पाचवेळा कंत्राट काढले़ जवळपास ३० कोटींचे काम असतानाही कंत्राटदारांनी या कामाकडे पाठ फिरविली आहे़ लातूरकर मात्र गेल्या वर्षभरापासून भंडारवाडीच्या पाण्याकडे आस लावून बसले आहेत़ कंत्राटदारच मिळत नसल्याने प्रशासन पेचात पडले आहे़
मांजरा प्रकल्पातून मिळणारे पाणी अपुरे पडत आहे़ गेल्या काही वर्षांपासून मांजरा प्रकल्प भरला नसल्याने लातूरकरांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत़ अगदी पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली़ यावर्षी टंचाईत मांजरा नदीवरील बॅरेजेसने काही प्रमाणात तहान भागविण्याचे काम केल्याने बॅरेजेसचा चांगलाच आधार झाला आहे़ मात्र, पर्यायी व्यवस्था असावी म्हणून मनपा प्रशासनाने नव्या ठिकाणच्या पाण्याचा शोध सुरू केला आहे़ लिंबोटी प्रकल्पातून पाणी आणण्याची योजना शक्य नसल्याने पुन्हा उजनीचा पर्याय समोर आला़
शहरापासून जवळ असलेल्या भंडारवाडी प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी मनपा प्रशासनाने निधीही आणला आहे़ शासनाने भंडारवाडी प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी जवळपास ३० कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर केला आहे़ निधी मंजूर झाल्यावर मनपाने पाचवेळा भंडारवाडी पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी निविदा मागविल्या़ प्रारंभी निविदा काढल्यावर केवळ एक निविदा आल्याने ती उघडण्यात आली नाही़ पुन्हा नव्याने निविदा मागविण्यात आल्या़ त्यावेळीही प्रतिसाद मिळाला नसल्याने मुदतवाढ देण्यात आली़ ३० कोटी रूपयांच्या कामाला कंत्राटदार मिळत नसल्याने मनपा प्रशासनही पेचात पडले आहे़ नेमकी चूक काय आहे? याचे संशोधन करण्यात अधिकारी व कर्मचारी मग्न झाले आहे़ आता पाचव्यांदा याच कामाचे टेंडर काढण्यात आले आहे़ लातूरकर मात्र पाण्याकडे अपेक्षा लावून आहेत.४
भंडारवाडी प्रकल्प ते वरवंटी हे जवळपास २२ किमीचे अंतर आहे़ २२ किलोमीटरची जलवाहिनी टाकून प्रकल्पस्थळी पंप हाऊसचे बांधकाम तयार करण्यासाठी २५ कोटी रूपयांचे आता नव्याने टेंडर काढण्यात आले आहे़
४रोड क्रॉसिंग, विद्युत अन्य बाबींवर खर्च करण्यासाठी त्या त्या वेळी तरतूद करण्यात येणार आहे़ शिवाय, वरवंटी येथे असलेल्या जुन्या जलशुध्दीकरण यंत्राच्या दुरूस्तीसाठीही राखीव निधी ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली़ ४
भंडारवाडी प्रकल्पातील पाण्याची लातूरकरांना नुसतीच आस लागली आहे़ जोपर्यंत जलवाहिनीचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत पाणी मिळणे अशक्य आहे़ जलवाहिनी टाकण्यासाठी खरेदी करावयाच्या पाईपची किंमत अधिक असून टेंडरमध्ये अत्यंत कमी धरण्यात आली आहे़
४महाग असलेले पाईप खरेदी करण्यासाठी ८० टक्के रक्कम संबंधित कंपनीला रोख द्यावी, लागणार आहे़ प्रांरभी गुंतवणूक मोठी असल्याने कंत्राटदार धजत नसल्याची चर्चा आहे़ कंत्राटदार मिळत नसल्याने काम रखडले असताना अजून किती दिवस मनपा कंत्राटदाराच्या शोधात राहणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे़