मनातील गाठ सोडविली तरच परमात्मा प्राप्ती शक्य
By Admin | Updated: May 6, 2015 00:28 IST2015-05-06T00:16:50+5:302015-05-06T00:28:38+5:30
जालना : कुणाहीबद्दल आपल्या मनात गाठ अर्थात आढी असेल तर परमात्म्यापर्यंत पोहोचता येत नाही, तसेच धर्माचे फळही मिळत नाही,

मनातील गाठ सोडविली तरच परमात्मा प्राप्ती शक्य
जालना : कुणाहीबद्दल आपल्या मनात गाठ अर्थात आढी असेल तर परमात्म्यापर्यंत पोहोचता येत नाही, तसेच धर्माचे फळही मिळत नाही, असा मौलिक सल्ला प.पू. मुनीश्री प्रसन्नासागरजी यांनी मंगळवारी बोलताना दिला.
जालना शहरातील सदर बाजार भागातील श्रेयांसनाथ दिगंबर जैन मंदिरात सुरू असलेल्या प्रवचनमालेत मुनीश्री बोलत होते. यावेळी प.पू. पियुषसागरजी, प.पू. सयंमसागरजी यांची उपस्थिती होती. प.पू. प्रसन्नासागरजी पुढे म्हणाले की, श्वास घेण्याचे काम म्हणजे जीवन नाही. आपला कुणावर विश्वास नसेल तर आपले जीवन एखाद्या मुडद्याप्रमाणे आहे.
जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा लागतो. मात्र, मरण्यासाठी यापैकी काहीच लागत नाही. सूर्योदय, दुपार, सूर्यास्त हे निसर्गाचे कालचक्र आहे. त्याचप्रमाणे मनुष्यासाठी जीवन-मरण हे कालचक्र आहे. त्यातून जावेच लागणार आहे. जीवनरूपी सूर्याचा अस्त केव्हा होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे दोन गोष्टी करा, त्या म्हणजे या संसारातील प्रत्येक जीवाबरोबर मैत्रीभाव ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे, या जीवनात आपला कोणीही शत्रू बनणार नाही, याची दक्षता घ्या. आपल्या मनात कुणाबद्दल आकस म्हणजे कॅन्सरच्या गाठीसारखा आहे. त्यामुळे गाठ असेल तर ती वेळीच मोकळी करून आनंदीदायी जीवन जगा, असा सल्ला प्रसन्नासागरजी यांनी दिला.
प.पू. पियुषसागरजी म्हणाले की, मन विचलित असल्यास ईश्वरापर्यंत पोहोचता येणार नाही. एकाग्रता ही श्रद्धेच्या माध्यमेतून वाढविता येते. झोप हा छोटा मृत्यू आहे. तर मृत्यू ही मोठी झोप आहे. परमात्मा प्राप्तीसाठी पूजा आणि आराधनेच्या माध्यमातून एकाग्रता वाढवा. एकाग्रतेद्वारेच जीवनातील ध्येय गाठता येते, असे ते म्हणाले.
प.पू. संयमसागरजी म्हणाले की, दिवस-रात्र हे कालचक्र ठराविक कार्य करण्यासाठी आहे. दिवसा इतरांवर उपकार, सेवा करण्यासाठी तर रात्र ही विश्रांतीसाठी आहे.दिनचर्याची सुरूवात देवाला नमस्कार, आई-वडिल आणि थोरांना वंदनेने करावी, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)