घरकुल मंजूर एकाला अन् धनादेश मात्र दुसऱ्यालाच!
By Admin | Updated: June 29, 2016 00:59 IST2016-06-29T00:12:46+5:302016-06-29T00:59:05+5:30
औरंगाबाद : इंदिरा आवास योजनेंतर्गत गंगापूर तालुक्यातील सात दलित कुटुंबांना घरकुले मंजूर झाली; परंतु घरकुलांचा धनादेश

घरकुल मंजूर एकाला अन् धनादेश मात्र दुसऱ्यालाच!
औरंगाबाद : इंदिरा आवास योजनेंतर्गत गंगापूर तालुक्यातील सात दलित कुटुंबांना घरकुले मंजूर झाली; परंतु घरकुलांचा धनादेश मात्र दुसऱ्याच्याच नावे देण्याचा प्रताप पंचायत समितीच्या अभियंत्यांनी केला आहे. दुसऱ्याच्या नावाचे धनादेश हाती पडल्यामुळे ती दलित कुटुंबे मात्र हवालदिल झाली आहेत.
यासंदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पंचायत समितीच्या अशा भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ उद्या बुधवारी गंगापूर येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. या प्रकरणात गंगापूर पं.स.चे गटविकास अधिकारी केळकर आणि अभियंता जैस्वाल हे दोघेजण जबाबदार आहेत. याविषयी जिल्हाधिकारी तसेच जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रारदेखील करण्यात आलेली आहे; पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हे प्रकरण फारसे गंभीरपणे घेतलेले नाही.
कदीम टाकळी येथील पुंडलिक आवारे, रंगनाथ दुशिंग, भुराजी थोरात, किसन मोटे, सोनाबाई पुसे, दगडू मोरे, केसरबाई मोरे या सात जणांना इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुले मंजूर झाली आहेत. या सातपैकी चार जणांना घरकुल उभारणीचे धनादेश मिळाले; पण उर्वरित तिघाजणांना दिलेल्या धनादेशावर मात्र दुसऱ्यांचे बँक खाते क्रमांक नमूद केलेले आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा मध्यवर्ती बँकेने सोनाबाई पुसे यांचे पैसे चिकलठाणा येथील शेतकरी जनार्दन दगडू यांच्या खात्यात जमा केले. जनार्दन दगडू यांचा इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुलाचा कसलाही संबंध नाही. अशाच प्रकारे अन्य दोघांचेही पैसे दुसऱ्याच्या खात्यावर जमा झाले आहेत. अभियंता जैस्वाल यांनी या सातही कुटुंबांकडून बँक पासबुकच्या सत्यप्रती घेतलेल्या होत्या. तरीदेखील तीन जणांना घरकुलाच्या पैशापासून मुकण्याची वेळ आली आहे. या घटनेचा निषेध भाकपाचे प्रा. राम बाहेती तसेच गणेश कसबे यांनी केला आहे.