सूचना फलक झाले केवळ शोभेचे बाहुले

By Admin | Updated: June 10, 2014 00:33 IST2014-06-10T00:26:59+5:302014-06-10T00:33:23+5:30

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई माहिती, सूचना व प्रबोधन यासाठी महत्त्वपूर्ण सूचना बजावणाऱ्या सूचना फलकांचा मुख्य उद्देशच दुरावत चालला आहे.

Only the ornamental arms of the notification panel were made | सूचना फलक झाले केवळ शोभेचे बाहुले

सूचना फलक झाले केवळ शोभेचे बाहुले

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई
माहिती, सूचना व प्रबोधन यासाठी महत्त्वपूर्ण सूचना बजावणाऱ्या सूचना फलकांचा मुख्य उद्देशच दुरावत चालला आहे. तर जाणीवपूर्वक सूचना फलकाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने शिकलेल्यांना सुशिक्षित कसे म्हणायचे? अशी संभ्रमावस्था यामुळे निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे, तर सूचना फलकांच्या बोर्डावर पोस्टर्स चिटकविण्याची जणू काही स्पर्धाच लागल्याने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना सूचना फलक हे त्यांच्या प्रसिद्धीचे मोठे साधन वाटत आहे.
पर्यटन स्थळाची माहिती, रस्त्याची वळणे, दिशादर्शक, घाटाची माहिती, धोक्याचा रस्ता अशी महत्त्वपूर्ण माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने सूचना फलकांची निर्मिती झाली. मात्र, सूचना फलकांचा प्रबोधनाचा मुख्य उद्देशच दुरावत चालला आहे. रस्ता अरूंद आहे. वाहने सावकाश चालवा, पुढे शाळा आहे, घाटाचा रस्ता याच्या सचित्र माहितीचे सूचना फलक रस्त्यावर उभे केलेले असतात. हे सूचना फलक मोठी दिशा दर्शवितात व महत्त्वपूर्ण माहिती देऊन जातात. याचा मोठा फायदा वाहनचालकांना होतो. अनेकदा हे सूचना फलक वाटाड्याचे कामही करतात.
मात्र, दिवसेंदिवस अशा सूचना फलकांकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने या फलकांचा मुख्य उद्देशच दुरावत चालला आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक, या ठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी सूचना फलक, गाड्यांचे वेळापत्रक लटकवलेले असते. तरीही प्रवासी या फलकाचा वापर न करता सर्रास गाडी केव्हा येणार अशी विचारणा करतात.
धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे, अशा सूचना वैद्यकीय महाविद्यालय व इतर ठिकाणी लिहिलेल्या आहेत. नेमके या ठिकाणीच पिचकाऱ्या मारल्या जातात. येथे वाहने पार्किंग करू नये, असा फलक दर्शविलेल्या जागी वाहने उभी असतात.
सूचना देणाऱ्या फलकाकडे दुर्लक्ष करीत जणू काही मनमानीचा ठेकाच आपल्याला मिळाला आहे, अशा आविर्भावात वागण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. या मनोवृत्तीमुळे सूचना फलकाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत चालली आहे.
सूचना फलकांचा उपयोग पोस्टर डकविण्यासाठी
सार्वजनिक बांधकाम विभाग व विविध शासकीय विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या सूचना फलकाच्या पाट्यांवर विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षांची पोस्टर्स हमखास डकवितात. परिणामी, हे सूचना फलक झाकले जात आहेत, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राम कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या संदर्भात उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांच्याकडे विचारणा केली असता सूचना फलक लावण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. स्वस्त धान्य दुकानातील भाव फलक अथवा नो पार्किंगचा बोर्ड, धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. या सर्व सूचनांची अंमलबजावणी न झाल्यास शिक्षेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. याबाबत त्या त्या विभागामार्फत ठोस उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे मंदार वैद्य म्हणाले.

Web Title: Only the ornamental arms of the notification panel were made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.