एकच विहीर भागवतेय पारडगावकरांची तहान
By Admin | Updated: August 13, 2014 00:49 IST2014-08-13T00:10:23+5:302014-08-13T00:49:22+5:30
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे १० हजार लोकसंख्या आहे. गावापासून दीड कि़मी. अंतरावर तलावाच्या शेजारी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन

एकच विहीर भागवतेय पारडगावकरांची तहान
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे १० हजार लोकसंख्या आहे. गावापासून दीड कि़मी. अंतरावर तलावाच्या शेजारी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन विहिरी आहेत. या विहिरीवर वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मरही आहे. परंतु यापैकी एकाच विहिरीवरून गावाला पाणी पुरवठा होतो. यातही जीर्ण जलवाहिनी व जलकुंभाला लागलेली गळती यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
पाणीपुरवठ्याच्या विहिरीपासून दीड कि़मी. पाईपलाईन असून ही पाईपलाईन पाच ते सहा जागेवर फुटलेली आहे. त्यामुळे जागोजागी पाण्याचे डबके साचते. गावात दोन जलकुंभ आहेत. एक नवीन तर दुसरा ४० वर्षापूर्वीचा. सध्या जुन्या जलकुंभातून गावाला पाणी पुरवठा करण्यात येतो. या जलकुंभाची अवस्था बिकट झाली आहे. पाईपलाईनद्वारे आलेले पाणी लगेच गावात सोडले तर ठिक नाहीतर या जलकुंभात पाण्याचा थेंबही राहात नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे जेव्हा नळाद्वारे पाणी सोडायचे तेव्हा जलकुंभात पाणी सोडले जाते. रात्री जलकुंभ भरून सकाळी पाणी सोडायचे झाल्यास टाकीत पाणीच राहात नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर या जलकुंभाला गळती लागलेली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. गावात चार वॉर्ड असताना केवळ दोन वॉर्डातच पाणीपुरवठा होतो. उर्वरित दोन वॉर्डातील ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.
पाणीपुरवठ्यासाठी गावात पाईपलाईन अंथरलेली असूनही अर्ध्या गावाला पाणी मिळत नाही. ग्रामपंचायतचा कारभारही रामभरोसे आहे. सदस्यांना बसण्यास जागा नसल्याने दरवर्षी ग्रामपंचायत बदलावे लागत आहे. बहुतेक कूपनलिका बंद आहेत. शासनाने पाण्यावर लाखो रुपये खर्च करूनही गावाला पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. (वार्ताहर)