५० विद्यार्थ्यांमागे केवळ एक जण शिष्यवृत्तीधारक !
By Admin | Updated: October 28, 2014 00:58 IST2014-10-28T00:02:56+5:302014-10-28T00:58:31+5:30
बाबूराव चव्हाण, उस्मानाबाद जिल्ह्यातून पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी बसत आहेत.

५० विद्यार्थ्यांमागे केवळ एक जण शिष्यवृत्तीधारक !
बाबूराव चव्हाण, उस्मानाबाद
जिल्ह्यातून पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी बसत आहेत.दुसरीकडे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या मात्र रोडावू लागली आहे. मागील चार वर्षाच्या निकालावर नजर टाकली असता, हे चिंताजनक चित्र डोळ्यासमोर येते. विशेष म्हणजे सरासरी विचार केला असता, ५० विद्यार्थ्यांमागे केवळ एक जण शिष्यवृत्तीधारक बनत आहे. ही बाब जिल्हा परिषद प्रशासनासाठी चिंतेत टाकणारी आहे. गुणवत्ता वाढविण्यासाठी नांदेडच्या धर्तीवर विशेष प्रयत्न होणे गरजेचे असून, नूतन जिल्हा परिषद अध्यक्षांकडून पालकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात असल्याचा दावा जिल्हा परिषदेकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याचे पालकांतून बोलले जाते. याचाच प्रत्यय मागील चार वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालावर नजर टाकल्यानंतर समोर येतो. २०११ मध्ये चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोच्या घरात असली तरी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या मोजकीच आहे. चौथीचे २८८ तर सातवीचे २८१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले होते. ही संख्या उंचावण्यासाठी प्रशासनाकडून वेळीच सुनियोजित प्रयत्न होण्याची गरज आहे. मात्र तसे झाले नाही. २०१२ मध्ये चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २३ हजार ४६३ विद्यार्थी बसले होते. उत्तीर्ण झालेल्यांची संख्या मात्र १३ हजार १४९ एवढी होती. तर अवघ्या २७७ जणांना शिष्यवृत्ती मिळालीे. म्हणजेच जवळपास ११ विद्यार्थी कमी झाले. हीच अवस्था सातवीच्या परीक्षेबाबत आहे. १६ हजार १५६ विद्यार्थी परीक्षेला बसले असता, ५० टक्केही विद्यार्थी उत्तीर्ण झाले नाहीत. हा आकडा अवघा ६ हजार ५५४ इतका आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मात्र पुन्हा १० ने कमी झाली. सदरील आकडा २७१ इतका आहे.
निकालामध्ये होत असलेल्या घसरगुंडीची बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभिर्याने घेतली नाही. २०१३ मध्ये चौथीचे २३ हजार १७४ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी ८ हजार २१४ जण उत्तीर्ण झाले. मात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या २५६ वर येवून ठेपली. जवळपास २१ विद्यार्थी कमी उत्तीर्ण झाले. सातवीच्या बाबतीतही काही समाधानकारक चित्र नाही. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. १७ हजार ८ विद्यार्थी परीक्षेला बसले असता, ७ हजार ३६६ जण उत्तीर्ण झाले. मात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या पुन्हा घसरली. सदरील आकडा २६९ पर्यंत खाली येवून ठेपला आहे. २०१४ मध्ये तरी हे चित्र पालटेल अशी आशा पालकांना होती. मात्र प्रशासनाच्या तोकड्या प्रयत्नामुळे त्यावरही पाणी फेरले गेले. चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २१ हजार ५७१ विद्यार्थी बसले. मात्र ६० टक्के विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या २५६ च्या आतच राहिली. सातवीच्या बाबतीतही वेगळी परिस्थिती नाही. १७ हजार १४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. येथेही ५० टक्क्यापेक्षाही कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर शिष्यवृत्तीधारक २८९ जण बनले. एकूणच हे चित्र जिल्हा परिषद प्रशासनाला आत्मचिंतन करायला लावणारे आहे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या उंचावी, यासाठी लोकप्रतिनिधीसोबतच प्रशासनानेही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या आणखीनच रोडावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
नांदेड जिल्ह्यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी पुढाकार घेत शिष्यवृत्तीधारकांची संख्या उंचावण्यासाठी विशेष उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यामध्ये दर १५ दिवसाला विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जात असे. ही परीक्षा घेण्यासाठी एका केंद्रातील शिक्षकाची दुसऱ्या केंद्रामध्ये नेमणूक केली जात असे. आणि पेपरची तपासणी अन्य शिक्षकांकडून केली जात असे. त्यानंतर या परीक्षेमध्ये ठराविक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष निवासी वर्गही घेण्यात आले होते. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा आलेख उंचावला होता. याच धर्तीवर उस्मानाबाद जिल्ह्यातही प्रयत्न करण्याची गरज पालकांतून व्यक्त होत आहे.