हरभरा हमीभाव खरेदी केंद्राच्या मुदतवाढीची नुसतीच औपचारिकता

By Admin | Updated: May 25, 2014 01:11 IST2014-05-25T00:42:25+5:302014-05-25T01:11:56+5:30

लातूर : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या हरभरा हमीभाव खरेदी केंद्रास मुदतवाढ देण्यात आली होती़

Only formalities of the deadline for the guarantee purchase guarantee | हरभरा हमीभाव खरेदी केंद्राच्या मुदतवाढीची नुसतीच औपचारिकता

हरभरा हमीभाव खरेदी केंद्राच्या मुदतवाढीची नुसतीच औपचारिकता

 लातूर : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या हरभरा हमीभाव खरेदी केंद्रास मुदतवाढ देण्यात आली होती़ परंतु, त्याची माहिती सामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचली नसल्याने त्याचा शेतकर्‍यांना लाभ होऊ शकला नाही़ त्यामुळे ही मुदतवाढ शेतकर्‍यांच्या हितासाठी की केवळ औपचारिकतेसाठी देण्यात आली होती असा सवाल निर्माण होत आहे़ शेतकर्‍यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा तसेच शेतकर्‍यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्राची योजना राबविण्यात येत आहे़ या हमीभाव केंद्रावर ३ हजार १०० रुपये प्रति क्विं़ दराने हरभरा खरेदी करण्यात येत आहे़ जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून लातूरसह उदगीर, औसा आणि अहमदपूर या चार ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र उभारण्यात येऊन गत फेब्रुवारीपासून हरभर्‍याची खरेदी करण्यात येत होती़ परंतु, याच कालावधीत जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतकर्‍यांच्या राशी रखडल्या होत्या़ यंदा उत्पन्न वाढले असल्याने खुल्या बाजारपेठेत हरभर्‍याला कमी भाव मिळत होता़ परिणामी शेतकर्‍यांचा या केंद्राकडे ओढा वाढला होता़ त्यामुळे दररोज शेतीमालाच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळत होत्या़ शासनाच्या सूचनेनुसार हे चारही केंद्र १० मे रोजी बंद करण्यात आले़ हे केंद्र बंद होण्याच्या कालावधीपर्यंत लातूरच्या केंद्रावर ३४ हजार क्विं़, औशात ११ हजार ५०० क्विं़, उदगीरमध्ये ८ हजार ५०० क्विं़, अहमदपूरच्या केंद्रावर ४ हजार ५०० क्विं़ हरभर्‍याची खरेदी करण्यात आली होती़ गारपिटीमुळे रखडलेल्या राशी करून शेतकर्‍यांनी हमीकेंद्रावर हरभरा आणण्याची धावपळ सुरु केली असताना हे चारही केंद्र बंद झाले़ या केंद्रास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत असल्याने शासनाने दोनदा मुदतवाढ दिली़ दुसर्‍यांदा देण्यात आलेली मुदत वाढ ही २४ मेपर्यंत असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यास १८ मे रोजी दूरध्वनीद्वारे देण्यात आली़ मात्र, या अधिकार्‍यांकडून सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत मुदतवाढीची माहिती देण्यात आली नाही़ त्यामुळे केंद्र बंद असल्याचे गृहित धरुन शेतकर्‍यांनी बाजार समितीत हरभर्‍याची विक्री केली़ दरम्यान, या कालावधीत बाजार समितीतील सर्वसाधारण भाव हा केंद्रापेक्षा ८०० रुपयांनी कमी होता़ त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे़११ मे रोजी हमीभाव खरेदी केंद्रास टाळे लावण्यात आले़ त्यानंतर शासनाचे जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यास १७ मे रोजी मुदतवाढ देण्यात आल्याचे पत्र मिळाले़ ही मुदतवाढ १८ मेपर्यंत होती़ त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मुदतवाढ ही कागदोपत्रासाठीच ठरली़ पुन्हा दुसर्‍यांदा दूरध्वनीवरुन २४ मेपर्यंत मुदतवाढ मिळाली़ परंतु, त्याची माहिती शेतकर्‍यांना मिळाली नाही़ हमीभाव खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळाली असली तरी त्याची शेतकर्‍यांना माहितीच नव्हती़ त्यामुळे शेतकर्‍यांनी खुल्या बाजारात कमी दराने हरभर्‍याची विक्री केली़ या केंद्राच्या लाभापासून शेतकरी वंचित राहिले असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापूरे यांनी सांगितले़ चारही हमीकेंद्र सुरु झाल्यापासून ते शनिवारपर्यंत २ हजार ६२७ शेतकर्‍यांच्या ७५ हजार ३९३ क्विं़ हरभर्‍याची खरेदी करण्यात आली आहे़ या केंद्रावर हरभरा विक्री केलेल्या शेतकर्‍यांचे २१ लाख २८ हजार ८०० रुपये गेल्या एक महिन्यापासून थकित आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांनी सामान्य शेतकर्‍यांपर्यंत मुदतवाढीची माहितीच पोहोचविली नसल्याने शेतकरी लाभापासून वंचित राहिले, अशी भावना शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे.

Web Title: Only formalities of the deadline for the guarantee purchase guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.